मंगळवार, २४ मार्च, २०१५

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३

मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो!
==============
होम म्हटला की मग तो वास्तूशांतिचा असो, किंवा हा विवाहहोम असो. सगळ्यांच्या प्रमाणे,बरेचदा वधू/वरांनाही कित्ती धूर होणार आहे नक्की!? हा प्रश्न होमाच्या-काठावर आलं की मनात पडतोच.
आणि मग..वर..आंम्हाला हा वरचा प्रश्न सरळ विचारतो..किंवा मग जोडी जरा बुजरी वगैरे असेल,(किंवा बुजत असेल! Wink )तरः- "फार धूर होत नाही ना!?" असं डॉक्टरला विंजेक्शनला घाबरणार्‍यानी- "नै..मंजे टोचायच नै ना फा.......र!?" असं विचारल्या सारखा विचारतो.मग आंम्हिही त्या वराला वधूच्या दिशेनी जाणारा डायल्याग मारतो:"धुराला भ्यायलात,तर पुढे आगिशी कसे खेळाल!?" असा कडक चेंडू टाकून एकंदर होमासाठी तयार करतो.
(नवर्‍या मुलास..) हम्म्म्म..चला आचमन करा... वगैरे सुरवात होऊन पहिला विवाहहोम अवरतो आणि मुलाला पाणिग्रहाणास्तव वधू समोर उभे करणे होते.(विवाह सोहळ्यातला हा एक अत्यंत टची आणि ग्गोगोड सीन! Wink ..)
आंम्ही:- हां ..आता तू समोर उभा रहा,आणि तिचा उजवा हात पाचही बोटांसह शेकहँड सारखा हातात घे पाहू!.. हां .. बरोबर.आणि आता दोघांनी पूर्ण १ मिनिटभर.एकमेकाच्या डोळ्यात बघत बसायचं..बरं का!.. इथे, काहि बुजर्‍या वरांना आणि वरवर अत्यंत धीट वाटणार्‍या वधूंना, अंतर्यामी इतक्या गुदगुल्या होतात,की पहिलं अर्धमिनिट दोघं खाली मान घालून हसतच रहातात.मग कडेनी ही गम्म्मत वेंजॉय करणार्‍या म्हातर्‍या बायकांपासून ते यांच्या मित्र.मैत्रिणींपैकी काहिंनी टाकलेल्या खास अक्षता यांना लागायला सुरवात होते.
मित्रलोक्सः- "किती वेळ??????? बास की!!!!!!!!!!"
मैत्रिणी:- (आजकाल या शिट्याही मारतात!..) आणि मग- "झालं झालं...आम्ही नै पाहिलं" अश्या कोरस मधे आरोळ्या वगैरे होतात. मग आम्ही त्यात हळूच शिरून खेळ पुढे नेतो. आंम्ही:-वराला उद्देशून " हे पहा,आज तू सर्वांसमक्ष हिचा हात हातात घेऊन,म्हणजेच पाणि-ग्रहण करून, असं सांगतोयस की, मी हिला हिच्या सर्व गुणदोषांसह,म्हणजे जशी आहे तशी धर्मपत्नी म्हणून स्विकारत आहे. म्हणजे......... नंतर तक्रार चालणार नाही हां!" (इथे बाजुनी हमखास हशा) " जशी आहे तशी स्विकारतो...म्हणजे हल्लीच्या नव संस्कृत मधे तुमचं..ते..काय म्हणता..ते...........
हां............ अ‍ॅज इट इज! (अजून हशा..आणि शिट्या सुद्धा!)
फोटोग्राफर बिचारे हा १ मिनिटाचा टेक १० मिनिटं चाल्लेला पाहून ७/८ अँगलनी फोटू मारून मारून दमतात. आणि मग हे पाणिग्रहण सुटतं.मुलगा उभा ठाकून अवघडलेला पाटाला-येऊन बसतो. आणि मग पुढे मुलिच्या भावाकडनं तिच्या ओंजळीत लाह्या घालणे..मुलानी वर हात धरून त्या लाह्या होमात आर्टीफिशियल धबधब्यातलं पाणि पडतं,तश्या सोडणे..फोटू वाल्यांनी योग्य ते फोटो घेणे.होमा सभोवती प्रदक्षिणा होणे..असं करत करत गाडी "कानपिळी" नावाच्या दिव्य ठेसनाला येऊन स्थिरावते.
हा ही विधी नसलेला विधी हल्लीच्या काळातला अत्यंत फेमस असा झालेला विधी आहे. आंम्ही वधूच्या त्या भावाला..ज्या द्यायच्या त्या सूचना देतो. मग भाऊ वराला,हातनी त्याचा कान धरून कानात-"माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करा.." वगैरे वगैरे.. ठरलेले (लोकं)शास्त्रातले उपदेश करतो/किंवा आंम्ही ते करवून घेतो. आणि मग फोटोवाल्यांनी त्या भावास -"हां... राइट..राइट..दोघांच्या मागे..तिथेच खाली बसं..येस..येस..बरोब्बर..कानाला धरा आता मुलाच्या" वगैरे भाव देऊन फोटो काढायला सुरवात केली..की परत कडेचं पब्लिक "ओढ..ओढ..चांगला जोरात" असा धोशा लावतं (हल्ली काही ठिकाणी हे भाऊ सुद्धा सख्खे/आत्ते/मावस/चुलत..असे सगळे यायला लागलेले आहेत!) मग तो कान चांगला पिळून वगैरे होतो.भाऊस आहेर देणेचे होते.

पण एकदा

एक अजब गंम्मत जाहली,हा भाऊ इतका बिच्चारा संथ आणि आज्ञा-धारक होता,की मी त्यांच्या कडून-"हा तुझा उजवा हात घे आणि(वराजवळ नेववून..)त्याच्या उजव्या कानाशी लाव" असं सांगितल्यावर त्या भाऊरायानी त्या उभयता पाठि असताना.....स्वतःचा(च) उजवा कान धरिला,आणि मला तितक्याच मख्ख पणे विचारलं:- "आता!!!!!!!!!!?" ( Dash 1 ) स्टेजखालच पब्लिक हसून हसून मरायच्या बेताला आलवतं..आणि मी ही विशेष जिवंत उरलेलो नव्हतो. तरिही मी जितका जीव माझ्या शिवात उरला होता...तो एकवटून त्याला सांगितलं:- अरे...मुला...आपला नव्हे...त्याचा कान धर!मग त्यानि पुन्हा त्याच आज्ञा-धारकपणे नवर्‍यामुलाच्या कानाला हात लाऊन परत चेहेरा.."आता!!!!!!?" असा केला(च). मग मी त्याला... "फिरकीचा नळ पिळून बंद करतात तसा पिळ आता तो कान" असं उद्-वेगानी सांगितलं,आणि त्या नवर्‍या मुलाचे बिचार्‍याचे हाल जाहले. तो पाटावरून अक्षरशः बोंबलत उठला. शेवटी त्या उप-स्थिंतापैकी एका समंजस मामाला, माझी आणि वधुवरांची दया आली...आणि त्यानी या आज्ञा-धारक भाऊरायाला स्टेजवरून फोटो वगैरे काढवून खाली नेला. आणि आंम्ही सगळेच...सुटलो! Lol
नंतर मग एकदा, आंम्हा भटजींच्या गप्पा चाल्लेल्या असतांना,एका (खर्‍या) ज्येष्ठःश्रेष्ठाकडून जे हाती लागलं... ते असं:-
ज्येष्ठःश्रेष्ठः- "ही...कानपिळी आहे ना..? का...य?. ती मंजे...तुम्ही हल्लीची मुलं ( Beee ) - वराचा कान/बिन पिळायला लावता ना..तसं काहि नाहीये.. समजलं!?
आंम्ही:-(हल्लीची मुलं Wink ..) :- "मग काय हो नक्की!?" Scratch one-s head
ज्येष्ठःश्रेष्ठः-"हां..ते सांगतो..असें समोर बसा आधी..! तो वधूचा भाऊ अस्तो ना.. जो त्या लाजा होमात बहिणीच्या ओंजळीत लाह्या घालतो ना....,तेंव्हा त्यावेळी त्या भावाला वरपक्षाकडून डोक्यावर (आहेर म्हणून..) जी पगडी चढवली जायची ना....,ती कानावर जिथे बसते..तिथे पिळा मारलेली असायची..म्हणून हो..ती कानपिळी(पगडी!), आणि तिचा तो आहेर.
आंम्ही:- अस्सं होय! (मनात..:-काय प्वॉइंट गावला! Biggrin )
ज्येष्ठःश्रेष्ठः- त्या शब्दातली ती पगडी,तुमच्या हल्लीच्या भाषेत काय म्हणतात ना...तशी ती सायलंट झाली,आणि ही (कान-पिळायची) नको ती ब्याद (आमच्या) नवर्‍यामुलांच्या-पाठिमागे आली!
आंम्ही:-(मनातः-ख्या..ख्या..ख्या..ख्या..!) अस्सं आहे होय ते!? बरं झालं कळ्ळं! थँक्यू हां बंडूतात्या थँक्यू!
ज्येष्ठःश्रेष्ठः- हो........... असू दे हो असू दे..ते थँक्यू कळ्ळं तुमचं! आता श्टेजवर असे जेंव्हा नाचाल ना..तेंव्हा तुंम्ही खरे! हॅ..हॅ..हॅ..हॅ.. (त्यांच्या समवयस्क मित्राकडे वळत..) सखाराम..तंबाखू दे..चल!
आता, "ते चांगलं..का हे चांगलं?" असा प्रश्न माझ्या मनात आला.केवळ या प्रसंगापुरताच नव्हे,तर धर्मक्षेत्रात असे अनेक ध चे मा..आणि(परत) मा चे ध.. जाहलेले आहेत..त्या साठीही! पण अश्या गोंधळाच्या प्रसंगी माझा तो काका माझ्या कानाशी येतोच आणि मला सांगतो:- अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे!
मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प!
===============

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१२

म्हणजे पुढील आयुष्याचे कंकण धाडसानी मनगटावर बांधता येइल...! Smile
======================
हम्म्म्म..
मग एकदाचं ते कसंबसं कन्यादान अवरतं.आणि परत आमची आपली पुढल्या गोष्टिंकडे नजर वळते. कंकणबंधनाच्या..सूत्रवेष्टणा'साठी मग तांब्यात सुतगुंडी टाकुन आंम्ही मुलामुलिच्या सजलेल्या करवल्या आणि अश्याच अजून दोन हौशी युवतींना यजमान संघातर्फे पाचारण करतो.आणि त्याही ड्रेस सावरत..मेकअप बरे-आहेत की नाहीत ते पहात स्टेज-धरतात. मग एक नेहमीचा प्रसंग येतो.आंम्ही या चौघींना सूत्रवेष्टणाचा तांब्या त्यातलं सूत्र जास्ती वेष्टं न होइल अश्या रितीनी,वेष्ट्वायला(समजावून) सांगून उभं करतो,आणि फोटुवाल्यांचं नेमकं तिथेच बिनसत!.. त्यांचं ते गुर्जी...ज...............रा,या बाजुनी या बाजुनी हे चालु झालं की आपलं टाळकं बंद पडायच्या बेताला येतं. एरवी आंम्ही मंगळसूत्र/लाजाहोम/सप्तपदीला फोटोकक्षेच्या जवळ जवळ बाहेरनच 'खेळत' असतो. पण इथे बाहेर पडायचं(फोटोवाल्यांसाठी) म्हणजे अंपायरनी स्टेडियम सोडण्यापैकीच! एकतर या पोरी/महिला/मुली..ज्या कोणी तो सूत्रवेष्टणाचा तांब्या फिरवायला येतात,त्या पहिली काहि मिनिटं..मूळ कामापेक्षा - आपला ड्रेस...त्यावरची ती ओढणी...चेहेर्‍यावरचा 'हलू' पहाणारा मेकप..(आणि..काहि प्रमाणात बटा!!!),हतात केवळ दृष्यमान होण्यासाठीच घेतलेलं रुमाल नामक,फक्त हतात नाचवायच फडकं! यात इतक्या गुंतलेल्या असतात..की वधूवरांच्या माने/कंबरेभोवती फिरवायच्या दोर्‍याचा गुंता'ची होइल.मग त्यांना आधी तयार करावं लागतं. कुणि कुठे आणि तिथेच्च का उभं रहायचं याची (नसलेली) शास्त्र सांगावी लागतात.
आणि मग विधिला सुरवात होते.वधूवरांना आमने-सामने बसवुन मानेभोवती/कंबरेभोवती वेढे मारणेत येतात.आणि त्याच सूत्रात हळकुंड बांधुन कंकण परस्पर हाती (एकदाचं) चढवून होतं.यातही त्या कंकणाची गाठ बसते ना बसते तोच कडेनी कुणितरी बसक्या अवाजाची म्हातारी नेहमीचा(ठरलेला) चेंडू टाकतेच-" उद्या...एका हतानी सोडायचं असतं हो...कंकण! ह्हॅ ह्हॅ ह्हॅ ह्हॅ!"
हे आज्जीबाईंच 'ह्हॅ ह्हॅ ह्हॅ ह्हॅ' अवरतं नं अवरतं तोच,फोटुवाला आंम्हाला मंगळसूत्रासाठीचं ताटं किंवा चौरंग मस्त "बनवा!" असं सुचवतो. ही फोटोवाल्यांची खास चलाखि असते. मग,"काहि विशेष विधि हे फोटोंसाठी अतीविशेष झालेले असतात,हेच खरं!" अशी आंम्हि(ही) आमच्या मनाची समजूत करवून घेऊन ते ताट अगर चौरंग घेऊन विड्याच्या पानांचं पंचदल किंवा तांदुळाचं अष्टदल अशी वेळेला खेळ(पुढे) मारून नेणारी इनस्टंट कलाकुसर करतो. आणि मग वेळ येते ती मंगळसूत्र वरानी वधूच्या गळ्यात घालण्याची. विवाह संस्कारातला हा सगळ्यात भारी शीन बरं का! आधी आजुबाजुच्या पब्लिक मधनं (हल्ली) काहि हौशी टाळ्या/शिट्ट्या येतात..मग वराला उद्देशून अडकला रे अडकला!!! अशी अरोळी पडते. किंवा मग- बकरं कटलं...!(त्यात मागून कुणितरी) कायमच! असाही अवाज येतो.आणि ह्या हल कल्लोळात आंम्ही आपली त्या मुलाला - "अता हे बघ हां,असा हात तिच्या डोक्यामागून घे आणि चेहेर्‍या समोर मंगळसूत्र धर बरं!" ........... "हां....छान.अता आधी फोटोग्राफर सांगतिल ते मंत्र ऐकायचे,आणि नंतर मी सांगेन ते म्हणायचे! आणि मंगळसूत्र गळ्यात घालायचं...काय???" वरः-" हो..............!" मग फोटोवाले , "जरा हात इकडे/तिकडे/वर/खाली...हां राइट राइट...नाऊ स्माइल..स्माइल.." असं करत तो वधूच्या चेहेर्‍यासमोर मंगळसूत्र धरण्याचा खास फोटो घेतात.आणि मग आंम्ही वराकडून ..म्हणा अता, "मांगल्यं तंतू... म्हणवत ते एकदाचं तिच्या गळ्यात घालवून नवर्‍या मुलासच समज देतो. "आपला जीव जपायची डबल जवाबदारी आपल्यावर बरं का अता!" तेव्हढ्यात ती मग्गाचची अज्जीबाई जवळ येते आणि आंम्हाला, "काय हो गुर्जी? फोटोवाल्यांना एव्हढा वेळ देता...थोडा आंम्हाला सगळ्यांना(???) बोलवायला द्यायचा..की....! कित्ती जणांचा हा विधी बघायचा मिस्स्स्स झाला..असे कसे तुंम्ही?..आं??" म्हणून उगाचच आमच्यावर तोंडसुख घेते. मग तिलाही आंम्ही.."अहो आजी...आजकाल विधिंना वेळ कमी आणि फोटोंना जास्त असच असतं...कुणितरी म्हटलच आहे-हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!... काय?" यावर म्हातारी खौटपणे मग-"अस्सं होय..भारीच म्हणतात..म्हणणारे!" असा उलट दगड हाणून गर्दीत नाहिशी होते.
एव्हढं होता होता..मग गर्दितून कुठून तरी स्टेजच्या जवळ काहि आवाजी डायलॉग ऐकायला येऊ लागतात "अगं.... ती मंगळसूत्राची ओटी अत्ताच ना..???"..."हो नै तर काय उद्या?...जा...जाऊन आण लवकर!"..."आणते...आधी त्या गुर्जिंना सासुकडनं सुनबैच्या पायात ह्या जोडव्या विरोल्या घालायला सांग...चहा पिउन पिऊन विसरलेत..बहुतेक!" असा दुष्श्ष्टपणानी ( Beee ) तिला आणि आंम्हाला संयुक्त दगड हाणते.आणि आंम्ही सा-वध होण्यापूर्वी मंगळसूत्राचे फोटो चाल्लेले असताना फोटोग्राफरनी ही चर्चा ऐकून सासूबैंसाठी तिथे पाट टाकलेला असतो. मग 'आपण विसरलेलो नसून काळजीपूर्वक अधिच तिथे "व्यवस्था" केलेली होती.' असा अभिनय चेहेर्‍यावर बाळगत..आंम्ही सासुबाईंना तिथे सूनबाईंना दागिने चढवण्यासाठी स्थानापन्न करून स्टेज खाली सटकतो... ते विवाहहोमाच्या तयारीला.............
आणि मग इथे, गुर्जी आणि यजमान पार्टी,यांच्यातला एक महत्वाचा दुवा (दुवाच तो!) अवतरतो...त्याचं सार्वनाम स्टेज'चं बघणारा पोर्‍या..गुर्जींचा हेल्पर असं काहिही ठेवलं तरी (कार्यालयातल्या) गुर्जी लोकांना ज्याचं खरं नाव ठाउक असतं...असा तो हा एकच! (हे रत्न...कोकणातलं असेल,तर विशेष तयार असतं.असा आमचा प्र'दीर्घ अनुभव आहे!) याचे आणि गुर्जीलोकांचे काहि खास बंध असतात..मग तो सुरु होतो.
तो:- काकानू....
मी:-(स्टेज'वर वैतागल्या मुळे..) काय रे!!!!!!!!!?
तो:-कुंड आनू???????????
मी:- नको!!!!!!!!!!!!!!!!!
तो:- असां कांय तों.........
मी:- विश्वास..अचरटपणा करू नकोस हां..बिडी मारायला पैसे नाय देणार नायतर
तो:- आं...चिडायचां नाय काकानू,मंग आमी मज्जा कोनाची करनार?
मी:-(भलताच संशय येऊन..) कोनाची करनार? मंजे??????????....मी चिडून ब्लडप्रेशर वाढवून अजिबात मरणार नाहीय्ये...काय समजलास??? होमकुंडं नी बाकिची तयारी घेऊन ये आधी...! अचरट माणूस..ज्जा..........
तो:- जल्ला कांय कल्ला नाय बग काका..का येवडा चिंडतस तें!!!
मी:-(रागानी..) मॅनेजरला हाक मारीन हां..........
तो:- (नीचपणानी...!) ह्ह्या...ह्या..ह्या... अरे काका हतच ठेवलाय ना श्टेजमागं... तुजा कुंड(????)
मी:-श्शी.............. विश्व्या....,अरे किती वेळा सांगितलय तुला? हा एक(तरी) शब्द पूर्ण उच्चारत जा म्हणून! कुंड काय??? आजुबाजुला कुणि ऐकलं तर काय वाटेल? कुंडं म्हणत जा नायतर होमकुंड म्हण.मंजे उच्चार चुकला तरी अर्थ बदलायचा नाही.
तो:- ब्वर..हा घे तुजा होमकुंड..आनी हा लायांचा ताट
मी:-आणि कुंडासमोर वधूवराचे पाट/पुजेचं ताट कोण लावणार??? आज काय विड्याखाली...नकोयत का?..हा अर्थपूर्ण बाण मात्र मग अचूक बसतो...आणि तो कुंडाभोवती रांगोळी कडेला सप्तपदी इत्यादी तयारीला लागल्यावर,मग आंम्ही वधूवरांस एकदाचे पाटावर घेतो...आणि शेला/उपरण्याची गाठ मारायला मुलिची (उखाण्यासह!)सवाष्ण बहीण/लाजाहोमातला हेल्पर कम कानपिळ्या..असा तो-मुलिचा भाऊ/त्याला मुलाच्याकडनं द्यायचा कानपिळीचा मान..असे अनेक पुढचे बाण हताशी घेऊन,,पुढील महत्वाच्या युद्धास तयार होतो...
ते
विवाहहोमाच्या..........
विवाहहोम हे एक युद्धच असतं.अनेक बालशत्रू त्या पटांगणात उतरू पहात असतात. हे बालशत्रू मंजे लहान मुलं हे अगदी उघड आहे. ह्यांच्या आया सुद्धा नेमक्या याच वेळी मुलांना नाष्टा वगैरे करवून देऊन कार्यालयाच्या रणभूमीवर हल्ला करायला सोडून देतात. आणि स्वतः..."हिची साडी फक्त इकडच्याच लग्नात 'कशी(काय)' दिसते!?" वगैरे कालातीत चर्चांमधे गुंततात! मग त्यातली काहि मुलं,कुठून तरी अक्षतां मिळवून, त्याचा मारा दिसेल त्याच्यावर करायला सुरवात करतात. तर काहि कार्टी नेमकी आमच्या लाह्यांच्या ताटाकडेही सरकतात. मारामारीच्या प्रांतातलं लाह्या..,हे अत्यंत हार्मलेस साधन असल्याचं त्यांच्या बालबुद्धीला नेमकं लक्षात येतं.या सगळ्या हल्ल्यांमधून कसंबसं नवरामुलगा/मुलिला पाटावर बसवून,आंम्ही मुलिच्या बहिणिला गाठ मारायला बोलवतो. मग तिला आयत्या वेळेस गाठ मारताना घ्यायचा ठरवलेला उखाणा,अत्ता आपल्या गाठिशी नाही...हे अठवतं.आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला.." अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही
............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ
गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!!
असा टाइम'बॉम्ब उडवतो...
मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो!
==============

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-११

हे सगळं-झाल्यानंतर,दमलेले आंम्ही आणि फोटोवाले- चहा/तंबाखू,या कार्या-लयातल्या (खास आमच्या) इष्ट विभागाकडे (हळूच) पलायन करतो!
==============================================
...नंतर काहि वेळातच यजमान-पार्टीचा आणि आमचा स्ट्रॅटेजीक टाइमाअऊट संपतो..आणि आंम्ही आपले परत मधुपर्क-कन्यादानाच्या पुढच्या शो'ला होस्ट करायची तयारी करायला लागतो.इकडे मुलीची आई/वडील/मुलगी इत्यादी सर्व.. होता होइतोपर्यंत (कदाचीत)घड्याळ दिसल्यामुळे..किंवा कार्यालयातल्या(हल्लीच्या)मॅनेजर या चतूर आणि लोकोपयोगी पदामुळे बढतीस चढलेल्या अश्या त्या.."कार्यालयाचा माणूस" नामक सर्वज्ञात-नटाच्या हतात सापडल्यामुळे..स्टेजकडे येऊ लागतात. आणि आंम्ही मुलिच्या आइला..."हं..आता मुलाला कन्यादानाचेवेळी द्यायच्या वस्तू...आणि तुंम्ही जर विशेष काही देणार असाल..तर ते घेऊन या बरंssss" अशी महत्वाची सुचना देतो.पण बरेचदा मुलिच्या आईला या सूचनेतलं ते महत्वाचं जर्राssssही कळत नाही. आणि मग नेमकं,स्कूलबस सुटायला लागल्यावर आपल्या मुलाला वॉटरबॅग द्यायची विसरलेल्या आईसारखी ती ,कन्यादानानंतरचे विधी चालू असताना..मधेच धावत येऊन आंम्हाला विचारते,"अहो आंम्हाला कन्यादानाच्या वेळेला ते--'हे' द्यायचंवतं ना!!!!...सांगितलत का नाही आम्म्हाला???" अता या प्रश्नावर आंमच्यासारखे गुर्जी-लोक..फक्त..."अत्ता आणा...!" एव्हढच उत्तर देऊन आपला कार्यालयीन बाणा जपत असतात.पण याच जागी जर का एखादे वयोवृद्ध...खाष्ट आणि तितुकेच स्पष्ट गुर्जी आणि या मुलिच्या आई नामक यजमानीण बाई असतील तर??????????? तर मग, लगीन र्‍हायलं बाजूला..आणि सांभाळा या तराजूला! अशी वेळ यांच्या भांडणात मध्यस्थीला यावेच लागणार्‍या (त्या..बिचार्‍या!)मुलिच्या बापाची होते!
यजमानीणः-अहो आंम्हाला कन्यादानाच्या वेळेला ते--'हे' द्यायचंवतं ना!!!!...सांगितलत का नाही आम्म्हाला???
खाष्ट गुर्जी:-मsssssग??? कन्यादानाच्या 'अधी' , जी सुचना केलीवती...ती काय फक्त तुमच्या कानांना???
यजमानीणः-हो का??? वा..वा..वा..वा..गुरुजीsssss कोण हो तुमचे गुरु? हे..असले कान-मंत्र देणारे?
खाष्ट गुर्जी:-का हो? झोंबलं का झोंबलं? वेळच्यावेळी सांगितलेलं तेंव्हाच्या तेंव्हा नीट ऐकायची सवय अजून लागली नाही का तुंम्हाला? ........................................ यजमान कुठायत तुमचे?
या टप्यावर म्याच आलेली आहे,याचा सुगावा लागून मुलिचा बाप एकदाचा येतो..आणि "अगं..तू नको त्या वेळी वाद काय घालत्येस? तेंव्हा नै दिलं तर अत्ता द्यायचं.अत्ता दिलस तर कोणी फासावर देणार आहे का तुला?... मsssssग?..जा घेऊन ये जाऊन..काय द्यायचं ते!"
यजमानीणः- ह्हो!!! फासावर कोण देइल? ते बघू तरी. नाही माझी मुंडी पकडण्याआधी पाताळधुंडीत घातला त्याला...तर नाव नाय सांगणार..." असं फणकारत ही मुलिची आई तिच्या कक्षाकडे वस्तू अणण्यास जाते.
आता तो यजमान..भटजींकडे वळतो,"गुर्जी..तुंम्हीपण कशाला तोंडी लागताय? चुकलं म्हणायच..आणि गाडी पुढे न्यायची."
खाष्ट गुर्जी:- हां आंम्ही पुढे न्यायची होय!? ती पण,तुमच्या सौंनी असा हँडब्रेक लावल्यावर ???
यजमानः-(टेकीला येत..) बरं..आता तिच्याकडनं तिच्या ऐवजी मी तुंम्हाला चुकलं म्हणतो.ती आली....की काय कुणाला द्यायचं ते घ्या देऊन...आणि जा पुढे." ...............इत्यादी...इत्यादी...!!!''
आता वरचा प्र-संग अगदी नेहमी घडणार्‍यातलाच असतो असं नाही.पण 'घडला' .. की अगदी असाच घडणार हे नक्की असतं. काय आहे ,की कार्यालयातल्या या खेळात,काही वेळेला काही गोष्टी या आमटीत जास्त पडणार्‍या तिखटा सारख्या किंवा कमी लागणार्‍या हिंगा सारख्या अगदी घडाव्याच लागतात.त्या शिवाय त्या दिवसाची-टेस्ट,खर्‍या अर्थानी डेव्हलप होत नाही. शेवटी मग एकदाचा तो कन्यादानाचा विधी सुरू होतो.आंम्ही आपले संकल्प वगैरे सांगून मुलिच्या बापाला मुलिच्या पाठिशी उभं करतो आणि कन्यादानाचे ...कन्यां कनक संपन्नां कनकाsभरणैर्युतां...वगैरे मंत्र म्हणून अर्थ सांगायला लागतो,आणि इथे मात्र माझ्यासारख्याला हल्ली कायम एक प्रश्न पडतो.शास्त्रातले खरे अर्थ हे बरेचसे कालविसंगत,किंवा सांगितले..तरी त्याची आजच्या काळानुसारंही 'संगती' न लावता येण्यासारखे! अश्यावेळी आपण करायचं काय? मग माझ्या त्या काका'चा सल्ला कानात वाजतो, "आत्मू ..हे बघ..ही धर्मशास्त्रे वगैंरे जी काही असतात ना,ती त्या त्या काळातले आपले विद्वान तेंव्हाच्या सोई बघून लिहितात,आपण आजच्या काळात आहोत हे भान जागृत ठेवायचं..काय समजलास??? मंजे आपोआप उत्तरं सापडतात..कशाला विचाराला हवाय कुणाला???...दे बरं टाळी!" (हा आमचा काका..आयुष्यभर खेडेगावी र्‍हायला,आणि तरी त्याला ही नवजीवनाची संजिवनी कशी मिळाली ? याचं मला अजूनंही कोडं आहे....असो!)
मग मी आपला,काकाचं स्मरण करून सुरु होतो.. आणि मुलाला सांगायला लागतो, "आता मुलिचे वडिल,तुला त्यांची सालंकृत कन्या ..म्हणजे केवळ अंगावरच्या असलेल्या अलंकारांसह नव्हे हो,तर तिला दिलेल्या संस्कार/विद्या/व्यवहार या तीन अलंकारांसह धर्मपत्नी म्हणून स्विकारण्यासाठी देत आहेत...काय? आहे ना मान्य?" मुलागा हो'कारतो.आणि मग पुढे कन्यादानातले पुढचे विधी होऊन,मुलाला मुलिच्या वडिलांकडून नेहमीची (आपली फेमस) धर्मे चं/अर्थे चं/कामे चं ही शपथ देवविण्याची वेळ येते.शपथ देववून होते.तीचे सगळे अर्थ सांगून होतात.सर्व काही छान..होतं.धार्मिक अर्थानी आई/वडिलांचा मुलिवरचा अधिकार संपतो.पण मायबाप म्हणून असलेली काळजी अंतर्यामी उरतेच.मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
शेवटी एक गोष्ट खरी आहे.धर्मशास्त्रांनी बांधल्या गेलेल्या विवाहासारख्या या ऐहिक-विधींचे अर्थ,पोथ्यांमधे-धार्मिक/जुनाट/चुकीचे/बरोबर कसेही असले तरी..त्याचं फलित हे नेहमीच ऐहीक असतं...असलं पाहिजेही! कन्या-दान..यातल्या दान या शब्दावर आपण आक्षेप घेतला,आणि तो मान्य असला/नसला तरी,आजच्या काळात मुलगा/मुलगी हे दोघेही आपापल्या आई/बापांपासून थोड्या अंतरावर जाऊन का होइ ना? अंतरणारच आहेत, दान होणार आहेत...यापुढच्या काळात,जुन्या आणि आधुनिक अश्या दोन्ही अंगांनी,माणसांच्या इहलौकिकाचा व्यवहार हा शास्त्रांपेक्षा बराचसा वेगळा असणार आहेच.त्यांमुळे आपण जुने विधी केले/सोडले..किंवा नवे विधी आणले/न आणले,तरी त्याचं फळ आजच्या काळानुसारच मिळणार आहे-या अटळ प्राक्तनाला,मानवधर्मशास्त्राचे फलित मानून हृदयामधे घट्ट जपावे.म्हणजे पुढील आयुष्याचे कंकण धाडसानी मनगटावर बांधता येइल...! Smile
=================

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१०

ती दुसरे दिवशी सकाळी...
देवकं---बसताना!
==============================
तर...
एकदाची ती सकाळ होते.होते,म्हणजे खर्‍या अर्थी रात्र संपते.अता रात्र संपते म्हणजे काय हो..??? तर अनेकदा हल्लीच्या "जेवणं आधी करू...मग धार्मिकविधी" या फेमस होऊ पहाणार्‍या पद्धतीचा तडाखा(तडाखाच तो!!!) बसलेला असला की गुरुजी आणि फोटूवाले या दोघांनाही उत्तररात्रीच घर पहावयास मिळतं.(आमच्या पहाण्यात तर,कार्यालयापासून दूर अंतरावर घर असलेला एक फोटू ग्राफर-रातच्याला घरापर्यंत गेला,आणि उंबरठ्यास शिउन परत पहाटे ५:३० ला कार्यालयात "हळद(होळी)समारंभास" उप-स्थित देखिल झाला!!! Biggrin ..) तर अशी ही तंतरलेली किंवा तन-तरलेली रात्र संपवून आंम्ही पहाटे अथवा सकाळी या दिव्य मंगल कार्यालयात येतो. आणि सवईप्रमाणे जाग न आलेलं स्टेज,आणि(त्यामुळे!)जागे झालेले कार्यालयाचे पोरे लोक,यांना पहात एखाद्या कडेच्या खुर्चीवर जाऊन निद्रिस्थ...आपलं ते हे..आसनस्थ होतो.
थोड्याच वेळात फोटोग्राफर आणि व्हिडिओवाले त्यांचा तो उन्हाळी-दिवा घेऊन मुलिच्या खोलितून 'सुटलो एकदाचे!' असा चेहेरा करत बाहेर येतात आणि आमच्या जवळ येऊन,नविन असतील तर-"आले का गुरुजी..वा..वा..चला चहा घेऊ" असं म्हणतात.जुने जाहलेले-"गुर्जी...आज मुलाला,रुखवताला दोन तास अधी घ्या!!!" (डॉक्टर पेशंटला ऑपरेशनला-घेतो तसे! Biggrin ) असा आंम्हाला,त्या दिवसाचा अंदाज देतात. तर तयार जाहलेले जवळ येऊन-"काहिही बोलत नाहीत"-आणि कडेच्या खुर्च्यांवर विराजमान होतात! ("काहिही बोलत नाहीत"-हे तयार..या इहलौकिक जमातिच प्रमुख लक्षण आहे!..असो!) आणि तेव्हढ्यात विशेष करून मुलाकडच्या 'आलेल्या मंडळींपैकी' एक जण आमचा निवांत चाललेला वेळ पाहून बेचैन होऊन आमच्या दिशेनी यायला लागतो..त्याला पहात काहि दुष्ट फोटूवाले आंम्हाला, "गुर्जी .. येऊ का???" असं खौटपणे म्हणून 'तिथून' दूरवरच्या खुर्चीवर आसरा घेतात. आंम्ही मात्र खुर्ची चुकवली,तरी यांना चुकवणार कसे?..या विचारानी येणार्‍या संकटाचा सामना(जो करावाच लागतो!) करायला 'तयार' होतो! आणि एक छोट्टीशी परंतू वन-डे चा घाम काढणारी टि-ट्वेन्टी झडते!
ते:-काय गुरुजी कधी सुरु करणार?नै..आठ वाजत आले!
आंम्ही:- स्टेज(आणि आंम्हीही) तयार आहेच.मुलिकडचे/मुलाकडचे आले की करू सुरवात!
आपल्याला असं वाटेल की या सरळ उत्तरानी म्याच टॉसमधेच संपली बहुतेक..पण नैsssssss! इतक्यात हे रामायण संपलं तर रावण वधाची(ह्हा..ह्हा..ह्हा..! Lol ..) मज्जा ती काय? अता कार्यालयात,तिथल्या धार्मिक विधिंच्या तयारीसह-स्टेज/गुरुजी/फोटूवाले..हे साईड आर्टिस्ट तयार असतील,तर नाटक सुरु व्हायला मुख्य पात्रांनी प्रवेश करायला हवा...हे साधं गणित अगदी अगणित वेळा ह्या त्यां"न्ना समजावलं,तरी त्यांचं "तुंम्हीच घाई करा!" (यांना करता येत नसते म्हणून!) हे पालुपद काही संपत नाही. Beee
ते:- पण..तुंम्हीच घाई करा!,म्हणजे येतील ते.
आंम्ही:- आंम्ही तिनदा घाई केली हो सकाळी आल्यापास्नं,अता ते येतील तेंव्हाच सुरवात होणार ना!???
ते:- अजुन एकदा(घाई)करा!
आंम्ही:-(वैतागून..) अहो,ते काय बद्धकोष्ठी लहान मुलाला "मोकळं" करायचय का?
ते:- शीssssssssssss कसल्या घाण उपमा देता हो,गुर्जी ना तुंम्ही???
आंम्ही:- तुंम्हाला छाssssssssन आणि नीssssssनीट सांगूनही कळत नाही. त्याला दुसरा इलाज काय मग?
ते:- (ह्यॅ ह्यॅ ह्यॅ...) चिडू नका हो
आंम्ही:- (सुटका झाल्याच्या आनंदात!) हम्मम!
मधे काहि क्षण निरव-जातात..आणि पुन्हा..
ते:- नै..मी क्वाय म्हण्टो..तरी तुंम्ही एकदा जाच!!!
आंम्ही:-(कुठ्ठे???) अहो..वारंवार गेलो,तर चिडतात लोकं(आणि अजून उशिर करतात)
ते:-मी सांगतो तुंम्हाला,जा परत..नै चिडणार यावेळी... जा....ना.....!!!
आंम्ही:-( Dash 1 ) हम्म्म्म!!!
ते:- प्लीज जा,मंजे मुहुर्तावर लागेल लग्न!
आंम्ही:- (अता हा असा ऐकायचा नाही,याची पूर्ण खात्री पटल्यानंतर..) चला...येता का तुम्म्ही पण माझ्याबरोबर???
ते:- अं..अं..मी कशाला???
आंम्ही:- अहो,घरच कुणि असलं की ऐकतील नै का आम्चं!?
ते:- नको हो...ते आमच्यावर येइल ना मग!
आंम्ही:-(हां..अता कसं खरं बाहेर आलं!) अता का? अता का? मंजे गुरुजी हा पदार्थ,मार अडवायची ढाल काय?
ते:- ह्हूं..(नेहमीचं पालुपद लाऊन) हल्लीच्या गुरुजिंकडून काहि अपेक्षा ठेवणं उपैगाचं नै!.... --- असं म्हणून ते-टळतात!
आणि आंम्ही वधूपक्षाच्या खोलितून बाहेर येणार्‍या मुलिच्या आईला पाहून सतर्क होतो. या मुलिच्या आईचं..''सर्व काही निर्विघ्न पार पडेल की नाही!?" या चिंतेनी ग्रस्त असणं आंम्हाला कळतं.आणि त्या अनुषंगानी येणारा काहि मारा..पण आंम्ही झेलतो. परंतू काहिकाहि वेळेला अगदी वैताग येतो.अता हा वैताग कोण आणतं??? मुलिची आई????? छ्छे... त्यांचा वैताग आंम्ही अधीच गृहीत धरलेला असतो हो. वैताग आणवणारं पात्र दुसरच असतं.त्याचा परिचय येणे प्रमाणे--- ज्यांचा या खेळात,केवळ उपस्थिती लावणं एव्हढाच रोल असतो त्या नात्यातल्या (म्हणजे- 'ना त्यातल्या..ना ह्यातल्या'! Beee .. ) काही बायका म्हणजे लग्नात-सर्वांचं टेन्शन वाढवायची सुपारी घेतलेलं खास पब्लिक असतं ना...त्यातल्या या... ताई किंवा अक्का!!! या ताई किंवा अक्कांचा पक्का समज असतो-"इथे कुणालाही का हि ही कळत नाही!" अगदी... मेकापवाली/गुरुजी/फोटोवाले/इतर नातेवाईक हे सगळे आयुष्यातलं हे "पहिलच" कार्य करायला आलेले आहेत,अश्या समजानी,या मांडवात वावरत असतात. देवक बसताना "घरून-घरचे देव-आणलेत की नाहीत?" हे यांनाच आयत्यावेळी,(म्हणजे सगळे पाटावर आले..की..) सु च तं! करवली सुद्धा अगदी तयार झालेली असली,तरी "ही 'खरी' आहे का?" ..हा प्रश्न यांना तिथेच (उघड उघड) पडतो. मधेच, फोटोवाले/व्हिडिओवाले नेमके "कुठे कुठे विसरतील?" हे यांना सुचतं आणि-"या"... त्यांनाही काहि मैलिक(?) सूचना करावयास जातात.आम्ही "मुंडावळ" हे प्रकरण करवलीच्या हतात देववून सुरवात केलेली असली तरी, "गुर्जी..मुंडावळ बांधायला सांगा ह्हंsssss!" असं या चारचौघात आंम्हाला सुचवतात. आणि या सर्व कोला-हलात एकदाचं देवक-सुरु होतं...
मग उशिर झालेला असला तरी, साग्र-संगीत देवक करवायची त्यांना हुक्की येते. आणि त्यांच्या पैकी कुणितरी एक अक्का किंवा ताई "या"--धनुष्य-बाण हाती घेऊन तिथेच कडेला बसतात. वास्तविक यांना काहि धर्मविधिंचं ज्ञान असतं असं नव्हे.पण महत्वाच्या मुव्हमेंट्स माहित असतात.त्या(तेव्हढ्याच!) आधारावर या समग्र कार्य क्रमाला जज करायला लागतात.अता कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाची सुरवात ही यजमान मंडळींना कुंकू-गंध-अक्षता भाळी लाऊनच होते, हे तसं सर्वमान्य आणि सर्वज्ञात असतं.पण तिथेही या सुरु होतात
अता आपण यातल्या काहि विशेष मुव्हमेंट्सची नुस्ती झलक पाहू या!
१) कुंकू लावणे..
आंम्ही:-चला..सगळे पाटावर बसले. हां...(इथे पहिला बाण येतो!)
त्या:- गुर्जी...कुंकू लावायला सवाष्ण लागेल ना कुणितरी...ज्येष्ठ!!!
आंम्ही:-(त्यातल्या शेवटच्या शब्दावर 'नजर' ठेऊन..) हां बरोब्बर..आता कुंकू लावायला कुणितरी ज्येष्ठ सुवासिनी बोलवा बरं....... तुमच्याकडची! (यातला शेवटचा बाण>--> त्यांना!!! Wink ..)
त्या:-कुंकू लावणारीची ओटीपण भरावी लागते ना..(हो गुर्जी)??? सुमन...घेतल्येस का गं जवळ!!!??? (या बाणानी ती सुमन-नामक मुलिची आई "कै तरी चुक्लं!" म्हणून बावरते!)
आंम्ही:-अहो...ताई...ओटी अत्ता नै कै..अत्ता फक्त नारळ किंवा विडा..इथलाच "मांडलेल्यातला!"(मुलिच्या आईचं "हुश्श्श्!")
आणि ओटी-मानपान वगैरे सगळं नंतर.. औक्षणाच्यावेळी
२) औक्षण..
आंम्ही:-(पुण्याहवाचन विधिच्या मध्यावर..) चला अता औक्षणाला या बरं! (असा स्टेजजवळील मुलिकडच्या लोकांकडे पाहून अवाज देतो.आणि उशिर झालेला असेल,तर.. वेळे'च्या गणिताला सांभाळण्यास्तव त्यातल्या ५जणिंनी किंवा ७जणिंनी या हा भाग वगळतो. आणि नेमकं याच वेळी............................
त्या:-(मुलिच्या आईला परस्पर) थांब गं..मी बोलावते..(असं म्हणून स्वतःसह ५/७/९ अश्या जेव्हढ्या मिळतील तेव्हढ्या सवाष्णिंन्ना घेऊन मैदानात येतात)
आंम्ही:-(ही वेळ येणारच आहे..हे ओळखून,"त्या" सवाष्ण शोधकार्यात गेल्यानंतर...मुलिच्या आईला,फोटूग्राफर-भटजी-युतिच्या व्यापक ऐक्याला धरून! Biggrin एक 'चेंडू' टाकतो! ) अहो काकू...त्यांना सगळ्यांना एकत्रच औक्षण करायला लाऊ या! नै का? नंतर लक्ष्मीपूजनाला सगळ्या वेगवेगळं करतीलच की..स्वतंत्र! नै का?
फोटूवालं:- काकू..सकाळची वेळ आहे..नॅचरल लाइटमधे एकत्र फोटो छान येइल अगदी...!
आंम्ही:- आणि प्रत्येकिला (औ-क्षणा Biggrin चा) स्वतंत्र मानही द्यावा लागणार नाही...नै का????? (हा अर्थ-शास्त्रीय बाण अचूक-बसल्यामुळे...) मुलिची आई पुढे सरकणार्‍या घड्याळाचे मान पहाता, हळूच हसत "आंम्हाला" संम्मती देते!
३) देवक आणि देवकाचा आहेर...
या औक्षणानंतर पुण्याहवाचन विधि संपतो.आणि ते सुपात मांडलेलं देवक अस्तं त्याची पूजा सुरु होते.यात त्यां"चं बाकि कुठेही लक्ष गेलं नाही तरी "देवकातल्या देवतांना हळद लावणे" या गोष्टीकडे (बरेचदा) लक्ष जातच
आंम्ही:- चला...मुलिच्या आई...तुंम्ही...ही अंब्याच्या पानांवर लावलेली तेल-हळद सुपातल्या देवतांना चढवा बरं..(फोटुग्राफरच्या पोज'ची सोय करतं!) हां...अता या बरं सुपा-समोर! (पण तेव्हढ्यात.....)
त्या:-(हस्त-क्षेप करून..) अहो..गुर्जी कुठची हळद लावायला सांगता तुंम्ही? ती सकाळी यांना लावलेली कार्याची हळद सांगा की!!!!!!!
आंम्ही:-(मनातल्या मनात..कपाळावर हात मारत) ब....रं...आणा!!!!!!!
त्या:-(विजयी मुद्रेने) मग..सांगायला नको का? असं कसं टाळता तुंम्ही?
आंम्ही:-(अत्यंत नाइलाजानी..) अहो(बाई!) ही हळद आधी देवाला लावतात..मग (मुलिकडच्या) माणसांना आणि त्याच्यानंतर ति'च हळद-तिकडे-मुलाकडे पाठवतात हे विसरलात काय?(आज???) आपण देवक 'घरी' बसवलं कीच हे (सगळं) क्रमात जमतं? नै का?
त्या:- हम्म्म्म! (असं म्हणून काहिश्या हिरमुसतात..आणि एकदाची "ही" किंवा "ती" हळद लागते!)
नंतर काहि वेळातच देवकाची त्या पुढील पूजा पूर्ण होते आणि येऊन ठेपतो..तो देवकाचा आहेर.
आंम्ही:- हं..चला(मुलिच्या नातेवाईकांच्या दिशेनी..) अता घरचा आहेर करायचाय हांsss! या बरं,ज्यांना ज्यांना करायचाय..त्यांनी!!! (अशी 'नेमकी' सुचना देतो.पण...)
त्या:-(अख्खा मांडव जमवायच्या बेताला येऊन..) ए.......वसुंध्रा...शमा..बेबी...या गं या...सगळ्या ..आहेर करायचाय ..चलाssss! (आंम्हाला..मगाचचा पराभव अठवत! ) ओ गुर्जी... हितच थांबा आहेर संपेपर्यंत!
तेव्हढ्यात मुलिची आई:- अगं अक्के...यांच्या आणि त्यांच्या-ह्यांच्या(????) भावानी करु दे की आहेर...एव्हढी सग्ळी कशाला जमवतेस?
त्या:- पायजेत..आज सगळ्या..नायतर आपली लोकं फोटोत कधी-येणार? तू बस खाली..गुर्जी कुंकू द्या हो इकडं(असं म्हणून सगळ्यांचा..पुढे सुमारे अर्धा तास(कित्तिही सेकंद असलेला!) त्या" खातात. आणि तेव्हढ्यात कार्यालयवाल्यांची 'नाष्टा संपल्याची' वर्दी लागल्यानंतर तिकडे सटकतात...हे सगळं-झाल्यानंतर,दमलेले आंम्ही आणि फोटोवाले- चहा/तंबाखू,या कार्या-लयातल्या (खास आमच्या) इष्ट विभागाकडे (हळूच) पलायन करतो!
====================================

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-९

==============================
मागच्या भागाचे साहित्यिक पौरोहित्य यादी-देऊन संपविले आहे. तेंव्हा म्हटलं आता मूळ खेळाला सुरवात करावी!
मग कुठनं सुरवात करायची बरं..? अरे सोप्पं आहे की! पब्लिक डिमांड! माणसे धार्मिक असोत अथवा नसोत. विवाह हे प्रकरण सगळ्याच लोकांना भरपूर एंजॉय करायला अवडतं... हे नक्की. मग घ्या अक्षता,आपण पहिलं लगन'च लाऊ या... करायची मग सुरवात ... बोला
शुभमंगलंsss सावधान!
यातल्या सुरवाती प्रमाणेच शुभमंगल-हा शब्द यजमानांसाठी आणि सावधान-हा पुरोहितांसाठी,अशी यात शुद्ध इहलौकिक विभागणी आहे. पण..हे कळायला पुरोहितपणामधे किमान १०० लग्न तरी, कार्यालयाचा गुरुजी ,म्हणुन उभे र्‍हाऊन..लावावी लागतात. आहेच तसं ते! यजमान-हा त्या शुभ आणि मंगला अधे अडकलेला असतो,म्हणूनच पुरोहिताचे चित्त अखंड सावधान असावे लागते...कार्य संपेपर्यंत! (कारण,आजच्या सर्व्हिसच्या काळात-त्याच्यावर खेळ रंगवण्याची जबाबदारी आहे हो! Smile )
पुण्यामधे तरी अजुनही आदल्यादिवशी संध्याकाळपासून ही(नाइट-डे)मॅच सुरु होते. कार्यालायाचे पोर्‍ये "पार्टी येनार...!" या तयारीत ग्राऊंड सु-सज्ज करून फिल्डवर नेमून दिलेल्या जागी उभे असतात. मॅनेजर दोन्ही संघांचे स्वागत करावयास कार्यालायाच्या दारात रांगोळी-लाऊन.....आपण निवांत हापिसात कार्यरत अथवा छा-मारत बसलेला असतो. आणि अचानक कार्यालयाचे दारात गाड्यांचे हॉर्न,माणसांचा कलकलाट यानी वातावरण "भरायला" लागतं. नेहमी प्रमाणे वधू'इलेवन्स् संघ आधी पोहोचतो.(त्यांच्या चेहेर्‍यावर -सर्व काहि यथस्थित पार पडेल..की पा...र-पडेल!!!? हे टेंन्शन,स्त्रीयांच्या मेकप आणि पुरुषांच्या नविन पोषाखांअडून डोकावत असतं) मॅनेजर त्यांना चला चला..या..या.. असे खास पुणेरी कार्यालयी डायलॉग टाकत टाकत "खोल्यांपर्यंत-नेतो".आणि मग...वधुपिता आणि माता हे उभयता, तिकडची मंडळी आणि कार्यालयाचे गुरुजी कधी येतात? ह्या एका प्रश्नावर लक्ष केंद्रीत करून बसतात. त्यात बर्‍याचदा वर'इलेव्हन्स् संघ आणि गुर्जि-नावाचा अंपायर एकामागोमाग (इथे क्रम कसाही गृहीत आहे. Wink ..) असे एकदाचे येतात! आणि वरपक्ष (त्याच खोल्यांमाधे..) स्थिरावण्यापासून,वधुपिता हा, 'त्या' संघाचा केवळ प्रभारी कॅप्टन..अंपायरकडे.. "नै..केंव्हा सुरवात करायची?" अशी नेहमीची विचारणा करायला येतो. आणि टॉस उडविण्याच्या वाटाघाटींपासून मॅचला एकं-दरीत--तोंड फुटते!
वधुपिता:- नै गुर्जी..कधि करायची सुरवात?
आंम्ही:- करू हो (या एका वाक्यानी बेचार्‍या वधुपित्यास २लिटर घाम फुटतो...पण गुर्जींनी "हो लग्गेच!" असं जरी उत्तर दिलं तरी "वेळ" तेव्हढाच जात असतो!) करू... मुलाकडची मंडळी आल्यावर.
वधुपिता:- नै म्हणजे पहिलं श्रीमंत(?)पूजनच करायचं ना..? ( हे मराठी भाषेतले,खास कार्यालयीन'विवाही-अपभ्रंश आहेत.. श्रीमंत(?)पूजन..लज्जा(???) होम... असो!)
आंम्ही:- यजमान..यजमान..श्रीमंत नै हो..सीमांतपूजन! (हे वाक्य पुरोहिताच्या मनातून उमटलं तर तो 'अट्टल पुणेरी',आणि सवईनी उच्चारत असेल तर तो 'पक्का घाटी' समजावा!)
वधुपिता:- (मनात..ब्वरं बरं कळ्ळं!) उघड- हो..हो.ह्हो.ह्हो..तेच ते! तर कधि करायचं ते? (या प्रश्नावर पुरोहित "कार्यालय" या संस्थेत "घोळलेला" असेल तर त्याला... जेवणाअधी..का नंतर? हा उपप्रश्न नीट ऐकू येतो..आणि "लोळलेला" असेल तर "नंतरच कारा..म्हणजे स्पेशल चार्ज घेता येइल तुमच्याकडून" हे वाक्य त्याच्या स्वमनी तरळतं! Wink ..)
आंम्ही:- यजमान..आधी सीमांत पूजन नै कै..आधी व्याहीभेट..मग सीमांत पूजन/वाङ्निश्चय.
वधुपिता:- बरं..मग काय काय तयारी त्याची.. (इथे वधुइलेवन्सच्या महत्वाच्या प्लेअरची म्हणजे मुलिची आई -या "खर्‍या कॅप्टनची" वेंट्री होते. याचं प्रमुख वैशिष्ठ्य 'नवर्‍याला वेड्यात काढणे' हे अस्तं)
मु.आई:- अहो.... तयारी त्यांच्याच कडे असते की! आपण आपली ज्येष्ठ मंडळी जमवू(लढाई पवित्रा!)
वधुपिता:- होय का हो गुर्जी?
आंम्ही:- होय अगद्दी बरोब्बर! तुंम्ही तुमच्याकडची पाच आणि मुलाच्या वडीलांसह त्यांच्याकडची पाच मंडळी जमवा आणि स्टेजकडे या ... आणि हो २ टोप्या आणा हो बरोबरं... आमच्याकडे एक्स्ट्रॉ नसते! (अजुनही व्यावसाइक पुणेरीपणात "नसते" या शब्दाला काहि ठिकाणी हक्काची जागा आहे. Smile )
हे वरील सर्व होऊन... आंम्ही स्टेजच्या कडेला ,म्हणजे बाऊंड्रीवर गंधाची वाटी आणि एक नारळ या तयारीसह,दोन्ही संघांची वाट बघत टॉस'च्या तयारीत बसलेलो असतो. आणि मग एकदा का मॅनेजर "चला..चला...नंतर जेवणाला उशीर होइल,जेवणाचं बंद होइल हां मग!" अशी विनंतीवजा धमकी द्यायला लागला की मंडळी खर्‍या अर्थानी गुर्जींकडे वळतात. आणि टॉस उडतो. व्याहीभेट सुरु होते. त्यात दोन्हीकडली पाच/पाच माणसे याचा अर्थ व्यवहारात कित्तीही असाही अनेकदा होतो.आणि कार्यालयाचा गुर्जी जो असतो,त्याला मॅनेजमेंटचा आशिर्वाद जितक्या प्रमाणात लाभलेला असेल तितक्याच प्रामाणात हा टॉस'चा खेळ संपन्न होतो.
आंम्ही:- (सौजन्य मोड ऑन..)
या या... दोन्ही व्याही पुढे या. (मग पहिला काहि वेळ त्यांना कॅमेरामनच्या दिशेने 'सेट' करण्यात जातो!) "हां...अता आपापल्या डोक्यावर टोपि घाला आणि एकमेकाला गंध लावा बरंsss"...इथे टोपि पटकन सापडली आणि गंध लावताना ते शर्टावर सांडलं नाही तर देशस्थीविवाहात तो फाऊल धरतात. आणि कोकणस्थी विवाहात यापैकी काहिही एक घडलं,तर ते कुळ त्या-दिवसानंतर अहंकार-बहिष्कृत समजले जाते! "अता एकमेकाच्या हतात नारळ द्या..कॅमेर्‍याकडे पाहून गळाभेट घ्या...हां...छान! अता येऊ द्या पुढची जोडी." असं करत करत १० मिनिटं किंवा एक तासात,ही व्याही-भेट सं प ते!
तोपर्यंत इकडे वराच्या करवल्या शोधवून त्यांना वराला स्टेजवर मुंडावळ्याबद्ध करवण्यात जातो. (पूर्वी करवली एकच असायची.अता किमान दोन ते कमाल कित्तिही..अश्या-त्या-असतात..असो!) होता होता वधुपिता आणि माता वराला "द्यायच्या-वस्तू" नावाचं अभेद्य प्रकरण घेऊन स्टेजकडे येतात.त्यातच ज्येष्ठ जावयांचा मान(मोडेपर्यंत)करणेचा होतो...आणि मग मुलाचे पाय धुवायचे की नाही? औक्षण एकीनी करायचं की पाचजणींनी..? ते ही एकत्र की स्वतंत्र.?-की स्व-तंत्र...??? अशी स्त्रीवर्गात बारिक बारीक..(परंतू अत्यंत महत्वाची) वाग् युद्धं झडून सीमांतपूजन सुरु होतं. नंतर तो वांङ निश्चय घडून मुलिची पूजा होऊन खेळ संपतो..एव्हढ्यात खरी प्रकरणाची सांगता लावता येइल... पण या सगळ्यात घडणार्‍या कॉमन गोष्टी मांडाव्याच लागतील..नाहितर ते सीमांतपूजन-वांङ निश्चय..कैचे??? दोन्हीकडली सुरवात कुंकूलावणे..आचमन प्राणायाम..संकल्प..गणपति/वरुण पूजन.. वगैरे शेवटापर्यंत जात असली...तरी,
फोटोग्राफर-व्हिडिओशुटींगवाले आणि भटजी,कार्यालयाचा स्टेज-नोकर आणि यजमानपार्टी,दोन्हीकडच्या-अर्थातच विहिणी(मुला/मुलिची आई) ही शीतयुद्धही त्यात असतातच.
पैकी..
क्रमांक १) फोटोग्राफर-व्हिडिओशुटींगवाले आणि भटजी---
फोटोवाले:- गुर्जी..जरा या साइडला..या साइडला..
आंम्ही:- अता ठीक आहे का?
फोटोवाले:- हां..ओक्के!
आंम्ही:-(हुश्श्श!)
फोटोवाले आणि कंपनी आणि गुर्जी हे समजुतदार(झालेले..) असले तरच हे एव्हढ्यात संपतं. नाहितर...
फोटोवाले:- "ओ..गुर्जी थोडे कडेला या ना" ...यात गुर्जी कोणत्याही कडेला असला तरी यांना त्याची 'बाजू' कायम चुकिचीच वाटत असते!
आंम्ही:- "मी कडेलाच आहे हो..तुंम्ही तुमची साइड जरा...मारा" ...इथे दोन्ही पक्षी, ठराविक बाणांचा मारा होऊन मगच प्रकरण मार्गी लागतं! वास्तविक गुर्जी हा कार्यालयीन धर्म-सेवा-वाहक...म्हणजे अंपायर अश्याही स्वरुपाचा असल्यामुळे,तो बरोब्बर वधु/वरपक्षाच्या मधे आसनस्थ जाहलेला असतो.पण फोटुग्राफरांच्या समस्त जमातीस त्याचं ते आसनस्थ..कायम "असं नस्तं!"..असच का दिसत अस्तं? ते तेच जाणोत.
क्रमांक २)
कार्यालयाचा स्टेज-नोकर आणि यजमानपार्टी---
य.पार्टी:- "तांदुळ कुठे ठेवतात ही लोकं... ओssss तांदुळ द्या होssss!"
नोकरः- "तिथे स्टेजखाली वाका...नीट नजर टाका..आणि घ्या (एक्स्ट्राचं..) ताट काढून" ..असा नोकर मंडळी य.पार्टीच्या बाऊन्सरला उपरकट मारतात.
मग चिडून य.पार्टीवाले आपल्यातल्याच कोणालातरी "अगं सुमे..काढ गं ताट ते..बघू तांदुळ म्हणून काय दिलनीत नेमकं!" असा बहुआयामी टोला लगावतात. नोकर कंपनी या सार्‍यात तय्यार असल्यामुळे हे सगळं मालकाच्या अंगावर गेलं तर जाऊ देत 'खोकलिचं'..म्हणून श्टेजमागं गपग्गार होते. यातही तय्यार नोकर मंडळी.."तांदुळ पायजे का?..देतो ना--सर(!)" अशी (सौजन्य-इन-कॅश) वाक्य टाकुन यजमानाच्या रागाचा मो-बदला अनेक ठिकाणी-घेण्याची तयारी सुरु करतात. बाकि बरीचशी तयारी ही 'पॅकेज'मधे लागू असल्यामुळे आजकाल या विषयावर फार वाग् युद्ध झडत नाहीत.
क्रमांक ३)
दोन्हीकडच्या-अर्थातच विहिणी(मुला/मुलिची आई)
वास्तविक हे शीतयुद्ध आध्यात्माप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय असल्यामुळे इथे देणे तसे गैरलागू आहे. आणि त्याची खरी मज्जा ही त्या ग्राऊंडवरच घ्यायचा विषय आहे,हे ही तेव्हढेच खरे. तरी आपण या युद्धात दुसर्‍या दिवशीची छुपी-तयारी कशी असते? त्यातले महत्वाचे काहि पाहुच! Biggrin
(हे संवाद प्रस्तुत धार्मिक विधि चालू असताना,आधे मधे घडत असतात,,हे सांगितलेले बरें हो..नै तर उगीच आमच्यावर आफत यायची! Biggrin )
मुलाची आई:- अहो..ते देण्याघेण्याचं आपण आजच उरकू या..नै का..मंजे बरं पडेल!
मुलिची आई:- "होय तर!!! आजच अवरायला हवं..उद्या राहून काय उप योग त्याचा(???)"
मुलाची आई:-"पण रुखवताचं उद्याच 'करावं' लागेल!"
मुलिची आई:-"ते उद्याच 'करणार' आहोत... हं हं हं-(हा हसण्याचा अभिनय आहे!) .. चालेल ना !?"
त्यातच-"आजकाल मुलिची आई..(काळाचा न्याय मिळून) बरीच पालटलेली आहे! असे (कुणी..कुणी) म्हणतात ते बाकि खरें हों!" ... अश्या प्रकारचाही संवाद स्टेजच्या कडेनी कानावर-पडत असतो.
मुलाची आई:- (मुलिला) साडी लवकर बदलून ये गं .. गुर्जी तुंम्हीही सांगा
मुलिची आई:- त्यांनी कशाला सांगायला हवं? तिला वेळ काढायची सवय नाही..... कार्यालयात वगैरे-आल्यावर ( ही दुसर्‍या दिवशिची-सर्वात मोठ्ठी ठिणगी! )
मुलाची आई:- अस्सं होय. गुर्जी कन्यादान किती वाजता हो उद्या? (या संवादात आम्म्ही एकंदर 'वजा' म्हणूनच गृहीत असतो! आणि हे ज्या गुर्जिस समजत नाही..तो कध्धिह्ही कार्यालयाचा 'गुर्जी' नसतो! )
मुलिची आई:- मुलगा आला कि सुरु करतात..नै का हो भटजी?
मुलाची आई:- अहो भटजी..किती वाजता उद्या ते सांगा कि ..(एकदाचं)
========================
यात पराभूतपक्ष हा नेहेमी..तिकडे सरळ काढायला न जमलेला राग,गुरुजी नामक वाफेच्या यंत्रात घालुन त्याचं पाणि करुन का घेतो हे आंम्हाला एक न उलगडलेलं कोडं आहे... असो!
विवाहातल्या या सर्व सायंकालिन घडामोडींना,क्रिकेटच्याच रूपकात नाव द्यायचं तर पहिल्या (रन---रेट वाढवणार्‍या) पंधरा ओव्हर असच द्यावं लागेल. त्यानंतर मग उरलेली म्याच होते...ती दुसरे दिवशी सकाळी...
देवकं---बसताना!
==================

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-८

यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ!
==========================================
याद्यांचं उत्तर रामायण संपलं. पण याद्या द्यायच्या म्हणजे गुरुजि लोकांनाच बहुशः त्यातल्या आज्ञार्थी अर्थानुसार वागावं लागतं. यजमान (हल्लीच्या भाषेत क्लायंटं.. ) याद्या न्यायला येण्याऐवजी फास्ट लाइफ स्टाइलच्या तडाख्यामुळे आंम्हासच विनवितात.. "गुरुजि यादी तुंम्हीच आणून देता का? प्ली...ज! "
प्लीज या शब्दाचा आतला अर्थ नो एस्क्यूज,असा असल्यामुळे आंम्हीही त्या नेऊन देतोच! आणी शेवटी तो शब्दही तेच बोलतो ना.. या..(आणी)..द्या! तस्मात दिल्याच पाहिजेत, जाता कुठं? Smile
हो... पण आज इथे जी काही यादी आंम्ही देणार आहोत, ती पूजेची यादी नसून गेली अनेक वर्ष मनात तयार झालेली यादिचीच पूजा आहे. तेंव्हा पूजा गोड मानून घ्यावी हो महाराजा!
ढिस्स्-क्लेमरः- यादीत शुद्ध-लेखनाच्या चुका झाल्या तर विनोद नोर्माण होतो,
म्हणूनच शुद्ध विनोदात ही यादी देत आहे!
Wink
१)हळदः- "लागली" हा वाक्-प्रचार वेगळा! इथे मात्र देवालाच वहाण्यासाठी! असे म्हणण्याचा मोह होतो..पण म्हणवत नाही. का??? असं विचाराल तर ही हळद "लागते" त्याचेच शीन डोळ्यासमोर जास्त तरळतात. लग्नाआधी जी हळद खेळली जाते,त्याला मी हळदिची होळी असं म्हणतो,पण आमचा एक महान मित्र मांडवात जे काही चालतं त्यावरून त्याला एकाच उपमेनी अमर करतो- हळदीघाटची लढाई! Biggrin
२) कुंकू:- ह्या नावाचा एक चित्रपट होता म्हणे पूर्वी. ह्यात नट किती ते माहित नाही,पण हे लावल्या शिवाय धार्मिक समारंभात बायका आजतागायत नटू शकलेल्या नाहीत,हे मात्र माहित आहे. अगदी कुंकवाच्या जागी टिकली येऊन टिकली तरी!
३)गुलालः- पैश्यासारखाच उधळला जातो,व तित्तकेच प्रदूषणही करतो.असा एक पदार्थ.
४)बुक्का:- स्वतःला कमीत कमी आणी दुसर्‍यांना जास्तीत जास्त लावायची चीज!
५)शेंदूरः- दूरान्वयानी पाहिलं,तर याला दगडाला फासून त्याचा देव करतात.आणी फासल्यानंतरंही एखादा 'दगडच' असला,तरी त्याला देव म्हणून 'धरतात.' श्रद्धा अंध असते,की हे अंधळे श्रद्धावंत असतात? हे यावरून पडताळून पहाण्यासारखं आहे.
६)अष्टगंधः- वास एकाच प्रकारचा येत असला,तरी याला अष्टगंध का म्हणत असावेत बंरं??? मला तर ह्या एकवासत्वामुळे याला अष्टगंध ऐवजी स्पष्टगंध असंच म्हणावसं वाटतं
७)उदबत्ती:- ही म्हणे हिंदू-मुस्लिम संस्कृतिची एकी झाली,तेंव्हा आपल्यात आली. बरोबर आहे,ही आपल्यात आली आणी एकी त्यांच्यात गेली.
८)निरांजने व समया:- (वाती/तूप/तेलासह) कंसातली माहिती अधिक इष्ट. त्या कंसानी कृष्णाला मोठं केलं.या कंसानी जागा व्यापून ओळ मोठी केली इतकच! आंम्हास काय? प्रकाश पडला..की झालं!
९)जानवीजोडः- हे हल्लीच्या काळातलं पूजेचं इमरजन्सी लायसन! जानवीजोड ही एक अजोड सोय आहे. मुंज म्हणजे लर्निंग आणी सोडमुंज म्हणजे परमनंट!
१०)बदाम/खारका:- तुंम्हाला आणायला जमत नसतील,तर आंम्ही आणू. तह करायची आपली जुनी परंपरा आहे. Wink
११) सुपार्‍या:- वरीलप्रमाणेच ! शेवटी सुपारी कोण कुणाला देतो,यापेक्षा दिल्यानंतर ती 'वापरतो' की नाही? ते महत्वाचं.
१२)नारळः- आत पाणी असल्यास उत्तम.नसल्यास गोटाखोबरं तरी हाती लागावं.(ही अपेक्षा..!)
कुठकुठल्या श्रींचे काय फलं मिळेल? हे सांगता येत नाही आजकाल. Wink
१३)कापुरः- हा काडी लावल्या लावल्या पेटतो. काहि माणसेही अशीच कापरासारखी पेटतात. मधली वितळण्याची क्रीया त्यांना ठाऊक नसते. हे आमचे संशेधन. कारण हे सं.शो. नावाचं धन माणसांनीच आंम्हाला दिलेलं आहे. तरी त्याला 'आमचं' म्हणणं हे कुणाचं संशोधन आहे? हे कळल्यास सांगावे.
१४)धान्यः- गहू/तांदूळ प्रत्येकी पावणेदोन किलो. अता पावणेदोन का? तर ते दोन हवे तसे पावणे,देव पावण्या इतकेच अवघड!
तरिही त्याचा हिशोब येणेप्रमाणे- धान्य पावणेदोन किलो+१२५ ग्रॅम खडे+१२५ ग्रॅम पोरकिडे=म्हण्जेच एकंदर दोन किलो.दाने दाने पे लिख्खा है,खानेवाले का नाम..(की पानेवाले का नाम? Wink ) सोइनुसार बदल कारावा.
१५)पात्रे:- तांब्या/ताम्हण/पळी/भांडे.. एकंदर चार पात्रे.
लेखकः-श्री.पा.टं.आसने..
दिग्दर्शकः-श्री.ता.टं.वाटलावे..
सहदिग्दर्शकः-श्री.पत्रावळी द्रोणे..
सूत्रधारः- श्री.चौरंगे..
गीतकारः-श्री.पे.न.यादिलिखे..
संगीतकारः-श्री.घं.टा.शंखेश्वर..
डान्सडायरेक्टरः-मास्टर शंकू तांडवे..
फाइट्सः-हणमंतराव गदाधरे..
चित्रपटाचे नावः- माणूस आणि धर्म!
१६)पंचामृतः- पंचावर सांडलं,तरी निरनिराळ्या प्रकारचे पाच डाग पाडू शकत नाही,इतका 'मृत' पदार्थ आहे हा..एकिचे तोटे याला समजाऊन सांगायला पाहिजेत कुणितरी.
१७)फुले(सर्व प्रकारची किंवा जातिंची):- यांच्यात जातिभेद करावा,असे आंम्हास वाटत नाही. कारण तो खरोखरच निसर्ग-निर्मित आहे.
१८)पत्री:- बेल(१०/१५पाने),तुळस/दूर्वा(प्रत्येकी दोन गड्ड्या) - अता गड्ड्या कित्तिही सांगितल्या,तरी सोडेपर्यंत सर्वांचे गुणधर्म एकच असतात.आणखि काय सांगू? Smile
१९)हारः- एक किंवा दोन..हे प्रमाण आंम्ही संतती नियमनावरून उचललेलं आहे. जास्त झाले,तर सुटे करून वापरावे.हे हारांच्या बाबतीत जमतं.. नै का???
२०)गुळः- २ ते ३ वाट्या.. किंवा ढेपा. (स्वेच्छेनुसार) याची ढेप असो,वा तुकडे.आजपर्यंत मुंगळेच-याला चिकटत आलेले आहेत. म्हणजे नक्की कसा चिकट अस्तो हो हा? कोकणी माणसासारखा? छे..छे.. अहो,कोकणी माणूस स्वतः चिकट असतो,पण चिकटणार्‍याला चिकटू देत नाही.पक्का हिशेबी असतो.
२१)साखरः- ही मारवाडी जातिची असावी.अशी आंम्हास एकतारी शंका आहे. तरिही हिला खाण्यात मुंगी सगळ्यात अग्रेसर! मुंग्या म्हणे स्वतःच्या कैकपट वजनाचा साखरेचा खडा वारुळी नेऊन जमवितात. माणसाला गोडव्याचा हेवा वाटतो,तर मुंग्यांना नुस्ताच हेवा न वाटता तो अनमोल ठेवा वाटतो.. असो!
२२)खोबरे वाट्या:-पुण्याच्या मार्केटयार्ड ज्येष्ठ व मंडईबाजारपेठ कनिष्ठ.. हे जसे भेद आपण मानतो,तश्याच ह्याही मिळतात.आवडीनुसार आणाव्या.
२३)वस्त्रः- हे सुद्धा हल्ली गुरुजिच आणतात.आणी गुरुजिंनी आणायला सांगितलं,की यजमान मांजरपाट आणून गुरुजिंची ताणतात.
२४)फळे:- अता धार्मिक कर्म कोणाला फळे? -तर..
जैशी अणावि फळे,तैसाची धर्म फळफळे।
उरलेले जाऊनी जळे,त्या वळचणीला॥१॥
होवो तयांसी सुबुद्धी,फळा कर्मी जडो प्रीती।
होय सत्कर्माची निश्चिती,आणखि काय सांगू॥२॥
फळाठाई ऐसा स्वभाव,कर्म तिथे मूळ भाव।
बाकि दिलेला ताव,वरंवरचा जाणावा॥३॥
ऐसी फळाची स्वल्प कहाणी,नव्हे ही मूळ गार्‍हाणी।
विषया-विषये अनुषंगाने,सहजची सांगितली॥४॥
२५)होमाचे इंधनः-गोवर्‍या व वखारितील लाकडे,आणि शुद्ध गाइचे..आपलं ते हे.. गाईचे शुद्ध तूप.
२६)होम कुंडः- पूर्वी होमासाठी विटांचे कुंड रचत असत,अता कुंडासाठी(म्हणजे त्याच्या आकारा नुसार) होमाची 'रचना' असते. Wink असो!
२७)काडेपेटी किंवा लायटरः- पहिल्या वस्तुचा गुणधर्म काड्या लावणे,दुसर्‍या वस्तूचा भडका उडविणे. आंम्हाला कोणतिही चालेल.आमचा उद्देश-दिवे लावणे! Biggrin त्यामुळे चिंता नाही.
२८)विड्याची पाने:-पूर्वीचा पैजेचा विडा जाऊन,अता मानाचा विडा आला. तेंव्हा विडा उचलून पैजा जिंकायचे,अता विडे खाऊन पैजा जिंकण्यावर जास्ती भर!
२९)सुटे पैसे:- सुटे पैसे..हा पुजेतला अगदीच चिल्लर'प्रकार असावा.कारण बरेचदा गुरुजिलोक जेव्हढे यादित लिहितात,तेव्हढे हे सुटत नाहीत! त्यामुळे बराच सुटा-घटक वाटतो हा.
३०)अभिषेक(करण्याचे)पात्रः-अभिषेक संपेपर्यंत अस्खलित धार पाडणारे पात्रच अभिषेकाला पात्र असते.तस्मात तसेच पात्र म्या पात्राला अपेक्षित आहे. Wink
३१)चौरंगः-चार खुरं असली तरी हा बर्‍याचदा अस्थिर बनतो.जमल्यास स्थिर'चौरंग द्यावा.पण हल्ली सरकार तरी कुठे स्थिरं आहे.त्याच्याशी जनता जमवून घेते.तसं आंम्ही जनतेशी जमवून घेऊ.. अरे..हाय काय आणि नाय का...य?
३२)पाट/आसने किंवा बैठका:-जिमिनीवर..बसताना आधार घ्यायला,यांचा आधार लागतो.तरी यांच्या शिवाय बसण्याला,आंम्ही निर्धार म्हणतो. असो!
३३)सोवळे किंवा स्वच्छ धुतलेले कपडे:-नाही निर्मळ जीवन।काय करीलं साबनं?॥ ही बहिणाबाईंची ओळ.या ओळिनी अनेकांचे अस्वच्छ वैचारिक घोळ(अगदी निरमा घालुन) घुतलेले आहेत.तरिही 'साबण' असं शुद्ध न लिहिता 'साबन' असं अशुद्ध लिहिलं..असं अजुनही काहि जणांना वाटतं.त्यांना नेमकं कश्यानी धुवावं? हा शुद्ध प्रश्न आंम्हाला तूर्तास पडलेला आहे.
३४)शंख आणि घंटा:-यापैकी शंख- हा काहि यजमान गुरुजिंच्या नावानी करतच असतात. पण तसाच गुरुजि यजमानांच्या नावानी करू शकत नाहीत.कारण तसा त्यांनी तो केला,तर हाति काय लागणार शेवटी??? घंटा(?????) सॉरी...सॉरी...तंटा..तंटा म्हणायचं होतं मला! (शंख आणि घंटा ही आपल्या संस्कृतितली कित्ती महत्वाची उपंकरणं आहेत नै??? Biggrin )
३५)रांगोळी:-म्हणजे रांगेत पडणारी गोळी...पण,अरे??? हळद/कुंकवानंतर यायला हवि होती.म्हणजे रांगेत पडण्याचा स्वतःचाच गुणधर्म विसरली कि काय? असो..कधिकधी होते आत्म-विसंगती!
३६)सत्यनारायणाचा प्रसाद(शिरा):-उशिरात उशिरा पुजेआधी तयार ठेवावा. तरच याचा मूळ गुणधर्म कळून येइल.
३७)नैवेद्यः-अन्नाचा महानैवेद्य..कंसात(राइसप्लेट Biggrin ) प्रत्येक गोष्टीला सारखं कंसात घातल्या शिवाय कंस सुटत नाहीत. पूर्वी उल्लेखिल्या प्रमाणे कृष्णाने तो कंस कायमचा सोडविला.ते भाग्य आपल्या पदरी नाही. तरिही देव नैवेद्य खात असता,तर स्वार्थी माणसानी तो त्याच्या समोर ठेवलाच नसता.(फुकटचा! Wink ) हे आमचं मत..पण,एरवी आंम्ही आपल्याशीच सहमत...चालू लोकशाहीचा परिणाम! दुसरं काय?
३८)कणकेचे दिवे:-अता दिवे कसलेही असले,तरी ते लावले कसे जातात? हेच महत्वाचे.नायतर लहानपणी आपण ऐकलेलं असतच की..,"अत्ता बॅट हाती घेताय.परिक्षेत काय दिवे लावणार आहात?तिथे काय तेंडुलकर येणारे का उत्तरं सांगायला?" असं म्हणून त्याच बॅटनी आपल्या दिवट्याची कणिक तिंबलेले अनेक पालक(म्हणजे स्वयंघोषित मालक) असतात. त्यामुळे खरे कणकेचे दिवे--ते!!!,लहानपणी हवं तिथे प्रकाश पडू न दिले गेलेले.
३९)गणपतिचं चित्रः- वास्तूशांतिचेवेळी हे दरवाज्याच्या वर इतक्या उंचावर लावतात,की नजर जात नाही.आमच्या मते हे चित्र लावण्यापेक्षा दारावर व्ह्यू-फाईंडर नामक एक भोक असतं.त्या आपल्या फाईंडखाली एक आरसा कडेनी दोन मोठ्ठे कान,खाली सोंड,वर मुकुट असं त्रिकुट करून लावावा. म्हण्जे येणारी व्यक्ति श्री.संतोष विघ्ने..अश्या अण्णावाची असेल,तर स्वतःचच तोंड आरश्यात पाहिल,व आपला गणपति जाहला..असं म्हणून निघून जाइल.आणि हा आमचा नवा गणपति निर्विघ्नता सिद्धिसाठी नक्की यश देईल.
४०)तोरणः-पूर्वी हे घराला दरवाज्याची चौकट 'बसली' की लगेच बांधत.आता आख्खं घरं बांधून झालं की मगच बांधतात.काहि का असेना? काहि गोष्टिंना "अजुनही टिकून आहे" या अनुषंगानिच महत्व राहतं,हे तरी काय कमी आहे?
४१)काळी बाहुली:-माझ्या लहानपणापासून मी एकही बाहुली काळी पाहिलेली मला अठवत नाही.म्हणजे माझी नजर कोणता रंग पाहाते? हा आत्मसंशेधनाचा विषय झाला.इतरांच्या बाबतीत हे घडत नसावं.काहि जणं काळे गॉगल लाऊन बाहुल्या पहातात,आंम्ही उघड! इतकच. ही काळी बाहुली घराला नजर लागू नये म्हणून टांगतात.तसलाच काहिसा गुणधर्म आमच्यात आला.ती आमच्या नजरेला-अशी आलीच नाही.
४२)मुंडावळः- नवर्‍या मुलाच्या बाबतीत घोड्याच्या डोळ्यावरची झापड व ही झापड सारखीच! लग्नात ही झापड मुलाला काय म्हणते?-"बाब रे! अत्तापर्यंत आजुबाजुचं सृष्टीसौंदर्य पहात होतास,अता यापुढे बायको हे सौंदर्य..आणि बाकिची फक्त सृष्टी!!! "
४३)सूपः- हे सूप म्हणजे टोमॅटो सूप नव्हे.देवक ठेवायला हे सूप लागतं. कार्याचे शेवटी हे सूप वाजलं की कार्य संपलं असं समजतात.पण हा भ्रम आहे. कारण पुढे संसारात एकमेकांवर आग पाखडायला या सुपाचा चांगला उप-योग होतो,तेंव्हा हे सूप नंतर गुरुजिंच्या हाती सोपवू नये.
४४)अता दक्षिणा(म्हणजे लास्ट बट नॉट लिस्ट अशी ती,आणि या लिस्टमधे पुन्हा लास्ट'च आली अशिही तीच! Biggrin आणि कुठेही 'आली-नाही' तरी कुण्णालाच चुकत नाही अशिही तीच! Biggrin ) ती दक्षिणा:-पुरोहितांच्या(जुन्या)पिढीच्या हिशेबा'नुसार-"आपल्या दृष्टिनी अत्यंत महत्वाचा व यजमानंच्या दृष्टिनी अत्यंत दुर्लक्ष करण्याचा एकमेव पदार्थ!" अता नव्या पिढिच्या हिशेबा'प्रमाणे:- "इथे खरं म्हणजे प्रमाण..असं काहि अता उरलेलच नाही..हेच या मताचे स'प्रमाण!" अजून काय सांगू?
हुश्श्श्श्श्श्श्श्श्श...........!!! संपली एकदाची..ती यादी!
पण अशिही ती संपते का हो??? प्रत्येक चित्रपटाची समाप्तीची पाटी ही एक सोय असते... खरी सुरवात होते,ती त्यानंतरच!
म्हणूनच पुन्हा एकदा
क्रमशः

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-७

आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला....!
=============================
उपासाच्या या सर्व पदार्थांना गुरुजि(लोकां) नी पहिले ३ ते ५ वर्ष कोऑपरेशन दिलं,की एक दिवस त्यांना स्वतःच्या पोटावर ऑपरेशन करवून घ्यावं लागतं. याच कारणास्तव आमच्या या गुरुजिंना एका नाडी वैद्याला गाठावे लागले. वैद्यराजांनी नाडी तपासली व एखादा ज्योतिषी भविष्य सांगतो,तशी त्यांनी बोलायला सुरवात केली.
वैद्यराजः- कायम अस्वस्थता वाटते..वेळेवर भूक लागत नाही.. निरुत्साह पाचवीला पुजलेला..लहानपणी पाचवी-पूजन नीट केलं होतं कि नाही? ते वडिलांना विचारा! सख्खी आणी आख्खी भावंडं दोन.. एक अ‍ॅसिडिटी,दुसरं बद्धकोष्ठता!..
गुर्जी:-वैद्यराज..कित्ती खरं खरं बोलता हो तुंम्ही? तुमच्या आणि माझ्या,दोघांच्याही मनातलं अगदी सगळं सगळं सांगितलत!
वैद्यराजः-अता पथ्थ्य ऐका.. दही,ताक वर्ज्य..सर्व अंबट पदार्थ वर्ज्य..तिखट वर्ज्य..तेलकट वर्ज्य..रात्री भात वर्ज्य..मसालेदार पूर्ण वर्ज्य... वर्ज्यही वर्ज्य!!!
(वैद्यराजांना मध्येच तोडत) गुर्जी:- वैद्यराज..काय खाऊ नये,यापेक्षा काय खावं.. हे सांगितलत,तर फार बरं होइल.
................................
थोडक्यात काय? तर ऐन तारुण्यात ते गुरुजी अनेक गोष्टी खायला मुकले. कारण उपासाच्या पदार्थांची जी कथा,तीच रोजच्या समोर येणार्‍या श्रीखंड,पुरणपोळी,जिल्बी इत्यादी सर्व पदार्थांची! सत्यनारायण व सत्यविनायक यांच्या कथेत फारसा फरक नसतो. पात्र वेगळी असली,तरी कथा त्याच..त्या साच्याची! तसलाच प्रकार.
इति श्री विविध अध्यायात्मकं..काव्यात्मकं..नाट्यात्मकं.. पोट-नारायण कथां संपूर्णम्। तत्सत् पोटा..र्पणमस्तु॥ (५चा डॉलर खिशात ठेऊ नका! Wink )
असो... अता सूचना आणी त्या अनुषंगानी आलेलं रामायण संपलं.त्यामुळे मुळ मुद्दा..यादी! तिच्याकडे आपण वळू या.. आणी मगच मलाही तुम्ही म्हणा..."अता या....!"
मी सर्वप्रथम लिखित यादिचा नाद सोडून सध्याच्या कॉम्प्युटर जमान्याच्या विधिलिखिताकडे याद्या टाइपण्यास का वळलो ते सांगतो. (इतक पूर्व रामायण ऐकलत,तर हे ही थोडं उत्तर रामायण ऐकाच अता! Lol )
होतं काय की आपण आपल्या कथित सू वाच्य नसलं तरी बर्‍यापैकी वाचता येणार्‍या अक्षरात याद्या लिहिल्या आणी त्याचे सतराशेसाठ झेरॉक्सं मारून ठेवले,तरी वाचणारा माणूस काय नजरेचा येइल हे सांगणं, नशिब म्हणजे काय? या प्रश्ना इतकच अवघड. त्यातनंही होतं असं की सरळ वाचणारा माणूसंही पूजेचं साहित्य आणायला बाजार नावाच्या महाआजारात शिरतो,तेंव्हा बरेचदा मूळ गोष्टी धरून (किंवा काही वेळेस सोडूनही) इतर नको तेच साहित्य आपल्यासमोर हजर करतो. त्यात पूजेची आणी गोंधळाची सारखीच दिसणारी यादी एकत्र नेली,किंवा एकत्र करून नेली..तर होणारा गोंधळ विचारायलाच नको! एकदा अश्याच एका ठिकाणी आमचे केळीचे खुंट त्यांच्याकडे आणी त्यांच्या'त वापरायचं उसासारखं गवताचं पाचाड आमच्या कडे असा 'बदल' झालावता. गोंधळी शहाणा म्हणून त्यानी खुंट-लावलेन नाइन! नाहीतर नंतर आंम्हाला पाचाड लागायची वेळ आली असती. त्यातही आपण लिहिलेल्या कुंकूचं-कुकू वाचलं गेलं तर फार अडचण नाही.पण तुळशी च्या जागी कळशी वाचलं गेलं तर काय???
या होणार्‍या सर्व त्रासाला वैतागून मी शेवटी एक दिवस याद्या साध्या नव्हे,तर चांगल्या कॉमप्युटर-टैपिंग करणार्‍या एका टायपिके कडून टाइप करून घेतल्या. मनात बंरंही वाटत होतं(कॉम्प्युटर वर टाइप करत असल्यामुळे!!! ) कारण शेवटी कॉमप्युटर हा आपल्या अग्रपूजेचा मान असलेल्या गंपतीबाप्पासारखाच..किंबहुना गंपतीबाप्पाच! किबोर्डं हे मोदकांच ताट..माऊस नावाचं उंदरासारखं वाहन(ज्याच्याशिवाय तो चालू'च शकत नाही! Wink ),आणी खर्‍या गंपतीबाप्पाच्याही वर कडी करेल अशी बुद्धिमत्ता साठवायची क्षमता!!! अशी त्याच्याविषयी(च) मला सांस्कृतिक ममता वाटत असल्यामुळे मी एका दिवशी आमच्या सदा शिवं पेठेतून,,'' ए...कॉम्प्युटर टायपिंग करणा...र" अश्या हळ्या...सॉरी सॉरी..पाट्या वाचत वाचत मला पटणार्‍या दरात टाइप करून देणार्‍या एका दुकानापाशी जाऊन ठाकलो. सच्चिदानंद टायपिंग इनस्टिट्यूट असं भलं आणि बरचसं मोठ्ठं नाव असलेली पाटी पाहिली.आणी (आमच्याच!) पुणेरी दुकान या लयाला जात असलेल्या संस्कृतितलं दुकान'पण त्या दिवशी सहन केलं.
पारंपारिक पुणेरी दुकानांचं काऊंटर हे साधारण शत्रूवर गोळ्या झाडायला युद्धभूमीवर जसं जमिनीपासून मारणार्‍याचं मुंडकं आणी शत्रूचं संपूर्ण शरीर दिसेल अश्या उंचीचा खंदक करून त्यात उभं रहातात..तसच करतात! मला पलिकडे माणूस आहे हा अंदाज आवाजाच्या आधी आणी तो पुरुष आहे हे आवाज आल्यानंतर कळालं... आधी फक्त डोकंच दिसत होतं हो .. त्यामुळे!
आवाजः- काय हवय???
मी:- टायपिंग करून घ्यायचय!
आवाजः-कधी?
मी:-अत्ता!
आवाजः-कसलं आहे?
मी:-का....य?
आवाजः- ऊंsssss... अहो टैपिंग हो!
मी:- पुजेच्या याद्या आहेत
आवाजः- अस्सं...
मी:-(काहि क्षण वाट पाहून!) इथेच मिळतात ना करून?
(हा प्रश्न अंमळ 'लागल्यामुळे') आवाजः- नै त काय वैकुंठात? थांबा जरा आमची टैपिस्ट डॉक्टरकडे गेल्ये.येइल एवढ्यात!
मी:- हात अखडले का हो टैपिंग करताना... नाही.. डॉक्टरकडे गेल्यात..म्हणून विचारलं!
आवाजः-हात कशाला अखडतील मरायला.. ह्हूंsss...इथे एव्हढं काम कुठाय हल्ली? अहो,नव विवाहीत आहे!
मी शेवटच्या उत्तरातील वाक्याच्या अखेरून अलिकडल्या शब्दातल्या नव आणी विवाहीत या विग्रहा मुळे,बर्‍यापैकी हदरलो... आणी आता ती बया किती वेळात येणार म्हणून विचारात पडलो. तेव्हढ्यात आलीच ती.आणी दुकानात पडिकावस्थेत असलेल्या मला पहात "या...या..या.." करत तिच्या कंमप्युटरच्या समोर घेऊन गेली. आणी शंभर याद्या छापायचं निश्चित करून गेलेल्या मला, तिनी सरतेशेवटी पाचशे याद्या आणी त्यावर शंभर व्हिजिटिंग कार्ड फ्री..अश्या योजनेत-अडकवलं! त्याआधी मला उगीचच पन्नास फाँट आणी व्हिजिटिंग कार्डासाठी सतराशे साठ डिझायनं दाखवून माझा वेळ खाल्लन. आहो... आत्माराम बापट, असं साधं सरळ आणी बरचसं निर्विकार नाव असणारा आमच्यासारखा माणूस त्या याद्या/व्हिजिटिंगकार्ड नसतं सुशोभिकरण करून कश्याला छापुन घेणार आहे? वाचताना,त्या याद्या पुजेच्या? की किराणामालाच्या??? असा संभ्रम वाचणार्‍यास पडू नये. इतकिच आमची अपेक्षा! काय होतं की त्या अतीसुबकीकरणामुळे वाचणारा यादीत हरवतो,किंवा वाचून झाल्यावर याद्या हरवतो. आमच्या दृष्टीनी दोन्हीही घातकच!
शेवटी..एकदाच्या त्या याद्या (आणी कार्ड..फ्री..!!!) छापून झाल्या,आणी दोन दिवसानी हतातही पडल्या. यादी यजमानाकडे म्हणजे हल्लीच्या भाषेत क्लायंटला देणे,यात "यादी रहाते आणी व्हिजिटिंगकार्ड हरवतं" असा एक मराठीभाषेतल्या म्हणि'सारखा उपप्रकार असतो. तो होऊ नये,म्हणून मी आमच्यातल्या..जन्मतःच कर्णाप्रमाणे मार्केटींगची कवच-कुंडलं घेऊन जन्माला आलेल्या एका महागुरु(जिं)ची एक आयड्या वापरली..आणी ती उत्तम आमलातही आली. आमच्या त्या गुर्जींच्या म्हणण्यानुसार (शंभौवाच! Wink )
तो:-अरे काय करायचं म्हायत्ये का?
मी:-काय?
तो:-"काय करायच की यजमान समोर आला रे आला..आणी काम ठरलं रे ठरलं..की यादी दिल्यावर नंतर एकाच्या जागी दोन/दोन व्हिजिटिंग कार्डं ,लहान मुलांच्या हतात जंबो देतात तशी ठिऊन द्यायची? पुढे यजमान गोंधळतो आणी प्रश्नात-पडतो..एकाच्या जागी..दोन/दोन वस्तू सुटल्या,आणी त्याही गुरुजिंकडून!
मी:-म....ग?
तो:-मग काही नै रे... समोरनं चेंडू येइपर्यंत वाट पहायची..आणी तो येतोच..यजमान म्हणतोच.. "अहो,गुरुजि यादी १ आणी व्हिजिटिंग कार्डं २/२ कशाला???"
मी:- म.....ग???
तो:-मग काय ...मग आपण चालू व्हायचं.. "सांगा यजमान..सांगा..दोन/दोन कार्ड कश्शाला?.." मग यजमान पुन्हा विचारतो:-"कशाला?" आपणः-" एक जपून ठेवायला..आणी दुसरं..हरवायला...!!! "
यजमानः-"क्का...य?" आपणः- "आहो...जे जपून ठेवायचं ते हरवतं..आणी हरवेल असं वाटतं ते वर्षानुवर्ष धूळ खात पडतं!!!" ... यजमानः- "हे बाकी खर्र खरं बोल्तात हो गुर्जी!!!..अता कार्ड नै हरवणार कध्धी!"
परिणामी
"यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ!
===============================