बुधवार, ११ जानेवारी, २०१२

पिंगु आणी शाळा(बालकाव्य)

एक छोटा पिंगु
नेहमी शाळेत जातो
आई ओरडेल म्हणुन
पटकन डबा खातो

खाताना झाली गंमत
घश्यात अडकला घासं
लवकर खायला लागलं
म्हणुन झाला त्रासं

घरी आल्यावर आई
डबा पाहुन चिडली
नीट खाल्ला नाही
म्हणुन वरात काढली

मग आमी शांगतो
नीट डबा खाल्ला
त्या येडपट चिंगुनी
धक्का देऊन पाडला

माझी चूक नाही
मला नको ओरडू
मग तूच म्हणतेस?
चिडलं माझं करडू

उद्या पासुन शाळेत
देऊ नको डब्बा
मधल्या सुट्टीत खेळेन
लपंडाव-पाणी-धप्पा

डबा खायची कटकट
आमच्या मागुन जावी
त्याच्या ऐवजी फक्त
मधली सुट्टी रहावी

आसा आहे पिंगू
आणी त्याची शाळा
वाजली शेवटची घंटा
चला आता प---ळा....

आजचा सवाल-'?'

मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...

पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?
बेधुंदीचा जीवन प्याला,का जहराने उगा भरु?....गं गं गं गं$$ माझे बाइ..!

प्र-धाडस ठायी असेल भारी,सावध चित्ता जरा करा
बेधुंदीही मरण दावीते,तीथे मनाला अवर जरा...रं रं रं रं$$ माझ्या राजा..! १

पु-इष्कही आहे काव्यही आहे,स्रुष्टी सारी बेहोषी
का थांबु मी जीवन म्हणते,नाते आहे धुंदीशी...

प्र-सैरभैरही नकोस धाऊ,जात तुझी पाचोळ्याची
वादळ/वारा उधळुन लावी,काय कल्पना साय्राची...२

पु-येडी म्हणु की खुळी म्हणू गं$$,ओळख नाही माझी तुला
जीवन मी अन मरणही मी गं,नकोस समजू खुळं मला...

प्र-दमले बाबा तुझ्या समोरी,अक्कल शिकवू कशी तुला?
कल्पनाच त्या साय्रा असती,नकोच झुलवू शब्द झुला...३

पु-अगं शब्दांचा हा खेळच सारा,कुठे शब्द अन कुठे झुला?
नाते जडते शब्दांनीही,समजुन घे रे सोनफुला....

प्र-(रागानी) अरे,भूल टाकूनी माझ्यावरती,तुझी हुशारी दाऊ नको..
उत्तर दे मग या प्रश्नाचे,तसाच पळुनी जाउ नको...४

प्र- जीवन म्रुत्यु असशील तुही,पहिले यातील काय असे..?
उत्तर दे रे विचार करुनी, ना जमले तरं तुझे हसे....

पु-अंगं मेला$$ जीव नी गेला मातीत,मिसळुन तुझीया कायेशी
तुझ्याच मधुनी संचय पहिला,म्रुत्युच असतो अविनाशी...५ 
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=

देवळातला शंकर

एकदा शंकर देवळात
कान उघडुन बसला
भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन
खुदकन मनात हसला

भं...भोले..ही अरोळी
खरोखरच छप्परतोड
कुणाच्या मनाची जखम
तर कुणाचा नुसताच फोड

माझ्याकडे येणारे असेच
कुणी शांत,कुणी भेदरलेले
आयुष्याच्या कलहात
कुणी मिटलेले,कुणी विटलेले

होते काहो ती अरोळी..
जीवनरोगाचे औषध?
का थोड्या वेळाचं मलम
नी शेवटी नुसतीच खदखद

तुंम्ही म्हणाल या खेरीज
दुसरा जालीम उपाय काय?
का तुंम्हीही अमच्यासारखेच..?
समस्या आली...की बाय बाय

मी तुम्हाला सांगेन...की
मीही तुमच्यातलाच आहे
फार पूर्वी माणुस होतो
अता मात्र 'देव' आहे

मोडुन टाका ते देऊळ
अणी मुक्त करा मला
माझा आधार..कशाला?
एकमेकांचा घेऊ...चला..!

पुरे झालं माझं नाव
अणी माझ्या नावाची सत्ता
हज्जारो वर्ष हेच चाल्लय
तुंम्ही शेंगदाणे...नी...मी खलबत्ता !

या कूट समस्येवर
येकच जालीम उपाय
जे माझं देवपण गातात
त्यांच अजाबात ऐकायचं नाय

नायतर रहा मनःशांती मिळवत
ती मार्क्स ची अफुची गोळी
मंजे तुमी व्हाल सरपण
अणी भाजाल त्यांचीच पोळी

जात आहे...धर्म आहे..
त्यांना कुटायला कमी काय ?
बघा कधी समजलं तर...
पुन्हा भेटूच...सध्या.. बाय बाय...

उप-वास स्पेशल-साबुदाणा खिचडी

ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा Wink)''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झालेल्या या खिचडीला पहीली सलामी एका श्लोकाच्या ओळीच्या विडंबनातूनच दिली होती-म्हणजे,,, ''विश्वाधारं गगन सद्रुशं मेघवर्णं शुभांगम'' असं आहे की नाई,त्याला ''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''...असं मी चावलं होतं Wink...असो अता जास्त च्यावच्याव न करता उरलेलं कवीतेवर सोडतो---तर श्रोतेहो खिचडी करीता वाहातो,ही शब्दांची खिचडी....................(ही आमची पारंपारीक-गुरुजी/यजमान म्याच आहे.)

यजमानांनी विचारलं-उपास...?
जरा खिचडी देऊ का?
चपला घालतच म्हणालो
त्या पेक्षा मी येऊ का?

का हो?तुंम्ही गुरुजी..
आणी खिचडीला भिता?
अहो,वाचायला फार सोपी
ही पचायला अवघड गीता

अहो,मस्त दही टाका
मजबुत दाबून हाणा..
म्हणजे नंतर सहा तास
पोटात गोळे आणा?

जुने गुरुजी मजबुत खायचे...
एक/दोन प्लेट?...विसरा
पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का
खाण्यापलीकडे...दुसरा?

पूर्वीचे गुरुजी कामं करुन
पराती करायचे फस्त
अहो,जुना स्कुटरचा काळ तो
एव्हरेज पेक्षा इंधन जास्त

जाउ दे गुरुजी आता..
राग विसरा..हट्ट सोडा
कालची खिचडी पचायला
आधी आणा १ सोडा

अशा तह्रेनी आंम्ही यजमानांचा
१प्लेट अपराध पोटात घातला
पण नंतर दिवसभर...
तो आमच्या पोटात उतला

श्रावणाचा संपत सोमवार
आंम्ही या खिचडीवर सोडला
आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला..... Smile

तंबाखू

०===तंबाखू===०
ओठ बरेचदा बदलतो
पण तंबाखू सुटत नाही
डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही

तोंडही जुन्या चाळीसारखं
तंबाखू म्हणजे बिह्राडकरु
ओठांसारख्या मोकळ्या खोल्या
ईकडे भरु का तिकडे भरु?

भाडेकरुंचं प्रेमही अजीब..
रहायला चालते कुठचीही खोली
एकीकडचा उडाला चुना..
की लगेच दुसरीकडे रहायची बोली

दारुवाल्यांना म्हणतात तळिराम
त्यांचा सगळा साजच मोठा..
आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा

आंम्हा दोघांची एकच गल्ली
त्यांना झाकुन आंम्हाला काढा
त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे
आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा

रस्ता वेगवेगळा असला तरी
वाट आमची एक आहे
त्यांचा अंड्याचा.....तर
आमचा साधा केक आहे

तरी आंम्हाला सगळे म्हणतात
अहो घाण असतं ते...सोडा..
च्यायला...यांना काय माहित
हे गाढव आहे..की..घोडा?

व्यसन ही एक व्रुत्ती आहे
तीला बांध घालता येत नाही
ते म्हाताय्रा सारखं आहे हो,
काठीशिवाय चालता येत नाही

हा वेढा सुटत नाही..पण,
लवकरच मी फोडणार आहे
खरचं सांगतो...उद्या पासून...
मी तंबाखू सोडणार आहे.

सकाळची गोष्ट

सकाळची गोष्ट आहे,
साक्षीला एस.पी.च पोष्ट आहे.

अशीच एक रिक्षा,एम.८०ला येऊन धडकली,
सवयीनेच रिक्षा आधी,एम८०वाली भडकली...

काय रे मेल्या,कुठे बघतोस?डोळे तुझे फुटले का?
रागाऊ नका गोखलेकाकु,गाडीचे काही तुटले का?

खरंतर चुक काकुंचीच होती,अचानक ब्रेक मारलेला
पण, गर्दीनेही कल पाहुन,रिक्षावाल्याला धरलेला...

लांबुनच मी पाहात होतो,रिक्षातही १काकु होत्या...
कदाचीत त्याही 'अपटे' असाव्यात,कारण लांबुनच पाहात होत्या...

रिक्षावालाही भलताच शुर,पन्नास जणांशी लढत होता.
त्यामुळे काकुंचा आवाज,एरवी पेक्षा चढत होता.

माघार कोणिच घेईना,एवढ्यात कोणितरी पोलिस धाडला.
ह्यांचं भांडण लांबच,पोलिसाचाच अवाज वाढला....

चढ्या अवाजात पोलिस बोलला,ए...बाकिच्यांनी दूर व्हा...
मी मनात म्हणालो,अता पोलिसाचा डाव पहा...

चुक काकुंचीच होती,पण पोलिस रिक्षावर धावला.
काकुंनाही चुक कळली होती,पण त्यांना पोलिस पावला...

पोलिसानी मग शिताफीनी,दोघांचाही बोका केला.
दोन्ही कडलं लोणी खाऊन,यांच्या हाती तराजु दिला...

मग दोघं म्हणाले,पोलिसानी आपल्याला लुटलं...?
त्याचा फायदा झाल्यावर,आपलं भांडण सुटलं...

मग कशाला भांडत बसलो?समजुन घेतलं असतं तर?
म्हणुनच दोन वहानात,राखावं सुरक्षित अंतर.

कधी कधी मी पुलंचा

कधी कधी मी पु. लं.चा,
कधी कधी मी अत्र्यांचा.
प्रश्न उरतो मधे फक्त वेलांट्या
आणि मात्रांचा||१||
पु.ल.म्हणत भगवंत ना,
तो तुमच्या साथ आहे.
अत्रे म्हणत भगवंत ना,
तो तुमच्या 'आत' आहे.||२||
म्हणजे पु.लं च खाद्य हे,
दही आणि भात होते.
तर अत्रे कृष्ण उपासक,
ते गोपाळ काल्यात होते.||३||
त्या गोपाळाला काला सोडुन,
जगता कधी आलेच नाही.
तर हा गोपाळ मुळातच काल्यातला,
त्याला काल्यानी सोडले नाही||४||.
काला म्हणजे कला,
की कला म्हणजे काला?,
जाउ दे ह्या कोड्याना,
मी का करु कलकला?||५||
पु. लं ना विनोदाची गोडी होती,
तर अत्र्यांना खोडी होती.
काही का असेना शेवटी,
एकच घोडागाडी होती||६||
पु.लना वाचक मिठी मारतात,
तर अत्र्यान्ना घडतो सलाम.
म्हणजे पुल ला(ई)फ बॉय साबण,
तर अत्रे सणसणीत हमाम.||७||
म्हणजे मी कुणाचा?
दह्याचा कि हंडीचा?
अहो हे दोघ माझे,                          
एरवी असतो
कोण कुणाचा?||८||
विनोदाच्या कांडीने,
बसते कधि झुकांडी.
पण कधिच होत नाही,
वाट त्यांची एकांगी ||९||
फटाक्यांच्या माळाच या,
सम्पल्या असे म्हणायचे.
पण नाद दडलेले कानी,
ते कसे सुटायचे?||१०||